अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:13 AM2020-05-21T09:13:22+5:302020-05-21T09:14:06+5:30

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

The demand to cancel the final year exams is unfortunate | अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणीच मुळात दुर्दैवी आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.

यासंदर्भात अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकच काढण्यात आले आहे. विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच ८ मे रोजी सार्वजनिकपणे सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध विद्यापीठांनी त्यासंदर्भात तयारी सुरू केली व परीक्षा-मूल्यमापन संचालकांनी तसे पत्रकदेखील काढले. मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी करणे खेदजनक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लाखो विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचे भविष्यातील रोजगार तसेच उच्चशिक्षणाच्या संधींवर याचा परिणाम होऊ शकतो. परदेशात किंवा इतर राज्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विचार करून पावले उचलावीत, असे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.

इतर राज्यात परीक्षा, मग महाराष्ट्रात का नाही?

राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्या असे सुचविले. राज्यातील एकाही विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्यात याव्या असा प्रस्ताव दिलेला नाही. मग शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी का केली, असा सवाल अभाविपने विचारला आहे. देशातील इतर राज्यांतही परीक्षा होणार आहेत. मग महाराष्ट्रातच का नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

 

Web Title: The demand to cancel the final year exams is unfortunate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा