विदर्भासाठी दिल्ली मार्च
By Admin | Updated: July 14, 2014 02:55 IST2014-07-14T02:55:41+5:302014-07-14T02:55:41+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भाला स्वतंत्र

विदर्भासाठी दिल्ली मार्च
समितीचे आवाहन : २४ जुलैला धरणे आंदोलन
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भाला स्वतंत्र करण्यासाठी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली आहे. समितीतर्फे २४ जुलै रोजी जंतरमंतरवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी आज, रविवारी समितीची विशेष बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. विदर्भवादी नेते २३, २४ व २५ जुलै रोजी दिल्ली येथे मुक्कामी राहून विदर्भाचा नारा बुलंद करणार आहेत. २४ जुलै रोजी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ११ जिल्ह्यांतून प्रत्येकी १०० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. विदर्भातील खासदार, आमदार व माजी खासदार यांच्यासह विदर्भाला पाठिंबा असणारे पी. ए. संगमा, सुब्रमण्यम स्वामी, मायावती, उमा भारती व तेलंगणातील तीन खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. आंदोलनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व भाजपा अध्यक्षांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येईल. निवेदनात जनमत चाचणीच्या निकालाचा समावेश करण्यात आला आहे. वेद, जनमंच, व्ही-कॅन आदी संघटनांना पत्र पाठविण्यात आले आहे, असे चटप यांनी सांगितले.
भाजपाने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यास विदर्भ स्वतंत्र करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय जहाज बांधणी व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाला लेखी पाठिंबा दिला होता. या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. सत्ताबदल झाल्यानंतर समितीने ११ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन धाडले होते. विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्र व विदर्भ विधानसभेच्या निवडणुका एकत्रच घ्याव्यात, अशी समितीची मागणी आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा चटप यांनी दिला. पत्रकार परिषदेत प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सदस्य नोंदणी
समितीतर्फे सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १० हजार अर्ज वितरित करण्यात आले आहेत. ३० आॅगस्टपर्यंत ५१ हजार सदस्य नोंदणी करण्याचे समितीचे लक्ष्य असल्याचे राम नेवले यांनी सांगितले.
विदर्भस्तरीय अधिवेशन
४ व ५ सप्टेंबर रोजी विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. विदर्भासंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्मरणिकेत असेल, असे दीपक निलावार यांनी सांगितले.