‘बी.ई.’ची पदवी होणार इतिहासजमा, आता मिळणार ‘बी.टेक.’ची पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:47+5:302021-09-23T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. ...

‘बी.ई.’ची पदवी होणार इतिहासजमा, आता मिळणार ‘बी.टेक.’ची पदवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येईल. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.
व्हीएनआयटीसह देशातील अनेक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’हीच पदवी प्रदान करण्यात येते. ‘एलआयटी’मध्येदेखील (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)‘बी.टेक.’ पदवीचाच अभ्यासक्रम आहे. मात्र नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ हीच पदवी देण्यात येत होती. विद्यापीठाने २०२०-२१ या सत्रापासून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ‘ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ असे केले आहे. त्यामुळे पदवीचे नामांतरण करण्याची मागणीदेखील समोर येत होती. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत परिषदेसमोर मांडण्यात आला होता. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत ‘बी.ई.’चे नामांतरण ‘बी.टेक.’करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने विद्यापीठाने वरील अधिसूचना जारी केली.
२०२०-२१ किंवा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, संचालित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयात ‘बी.ई.’ प्रथम वर्षात प्रवेश घेतला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’पदवी प्रदान करण्यात येईल. यानुसार २०२३-२४ या सत्राच्या अखेरीस अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी ‘बी.टेक.’ पदवीधारक असेल.