मुंडे यांच्या विरोधात ‘आप’चे धरणे

By Admin | Updated: June 27, 2015 03:21 IST2015-06-27T03:21:14+5:302015-06-27T03:21:14+5:30

भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचे राज्यात एक वर्ष पूर्ण व्हायचे असतानाच

Defend the AAP against Munde | मुंडे यांच्या विरोधात ‘आप’चे धरणे

मुंडे यांच्या विरोधात ‘आप’चे धरणे

राजीनामा द्या : चौकशीची मागणी
नागपूर : भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचे राज्यात एक वर्ष पूर्ण व्हायचे असतानाच कोट्यवधी रुपयांचा चिक्की घोटाळा समोर आला आहे. कोट्यवधीचे कंत्राट विनानिविदा देण्यात आले. तसेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले. या एकूणच प्रकारणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून असल्याचा आरोप करीत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी व्हेरायटी चौकात धरणे दिले.
आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून एका दिवसात तब्बल २४ आदेश काढले. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे तीन लाखावरील कामासाठी ई-टेंडरिंग करण्याची अट असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या वेळी ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनात विदर्भ मीडिया संयोजक मंगेश तेलंग, नागपूर जिल्हा संयोजक अशोक मिश्रा, सहसंयोजक कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, पीयूष आकरे, कृतल वेळेकर, ईश्वर गजबे, राजेश शेवळे, रवींद्र गिधोडे, मनोज वरघट, किरण वेल्लोर, चंद्रशेखर पराड, गीता कुहीकर व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Defend the AAP against Munde