ंअपंग व्यक्तीचा अर्ज घेण्यास म्हाडाकडून नकार
By Admin | Updated: May 31, 2015 02:52 IST2015-05-31T02:52:19+5:302015-05-31T02:52:19+5:30
नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत,

ंअपंग व्यक्तीचा अर्ज घेण्यास म्हाडाकडून नकार
कमलेश वानखेडे नागपूर
नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत, याचे आणखी एक उदाहरण समाधान शिबिरातच पहायला मिळाले. अंबाझरी येथील रहिवासी आशीष गजभिये या अपंग व्यक्तीने म्हाडाच्या काऊंटर क्रमांक ८ वर दुपारी ३ वाजता अर्ज दिला असता तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळ संपल्याचे सांगून अर्ज घेण्यास नकार दिला. शेवटी अपंग व्यक्तीने गोंधळ घातल्यावर व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर अर्ज स्वीकारण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या शिबिरात जर अधिकारी-कर्मचारी असे प्रकार करीत असतील तर इतरवेळी ते नागरिकांचे खरच समाधान करीत असतील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिबिरासाठी २५ तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. तर शनिवारी वेळेवर येणारे अर्ज दुपारी ४ पर्यंत स्वीकारले जातील व त्यावरील कार्यवाही २० जूनपर्यंत केली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी बरेच नागरिक आपापले अर्ज घेऊन शिबिर स्थळी आले. त्यांचे अर्ज स्वीकारण्यातही आले. दुपारी ३ वाजता अपंग असलेले अंबाझरी येथील रहिवासी आशीष गजभिये व अनुप खांडेकर हे शिबिर स्थळी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) च्या ८ नंबर काऊंटरला गेले. गोधणी येथे एमआयजी २० योजनेंतर्गत त्यांना म्हाडाचा भूखंड मिळाला आहे. गेल्या चार वर्षांपासून ते म्हाडाच्या चकरा मारत आहेत.
मात्र, त्यांना अद्याप परवानगी मिळाली नाही. शिबिरात दुपारी ३ वाजता अर्ज द्यायला गेले असता गजभिये व खांडेकर या दोघांचाही अर्ज घेण्यास उपस्थित अधिकाऱ्यांनी नकार दिला. आतापर्यंत आलेल्या १८ अर्जांची माहिती आम्ही वरती पाठविली आहे. त्यामुळे आता तुमचा अर्ज घेता स्वीकारता येणार नाही. अर्ज स्वीकारला तर पुन्हा माहिती पाठवावी लागेल, असे कारण अधिकाऱ्यांनी दिले. यावर अपंग असलेले गजभिये यांनी अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली. पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांची साधी दखलही घेतली जात नव्हती. यामुळे गजभिये यांनी गोंधळ घातला. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जमले व विचारणा करू लागले. हे पाहून एक वरिष्ठ अधिकारी तेथे आले व त्यांनी अर्ज स्वीकारण्याची सूचना केली. त्यानंतर कक्षात उपस्थित अधिकाऱ्यांनी अनिच्छेने अर्ज स्वीकारला.