कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:34+5:302021-01-13T04:18:34+5:30
खापरखेडा : वाट चुकलेल्या हरणावर कुत्र्यांची नजर पडताच त्यांनी हल्ला चढविला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) परिसरातील नांदा शिवारात ...

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू
खापरखेडा : वाट चुकलेल्या हरणावर कुत्र्यांची नजर पडताच त्यांनी हल्ला चढविला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) परिसरातील नांदा शिवारात शनिवारी (दि. ९) दुपारी घडली.
काेराडी मंदिर परिसरात माेठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या भागात झुडपी जंगल असल्याने तिथे हरणांसह रानडुकरांचा वावर आहे. बांधकामासाठी या भागातील झुडपे माेठ्या प्रमाणात ताेडण्यात आल्याने या वन्यप्राण्यांच्या जीवितास धाेका निर्माण झाला आहे. दरम्यान, या भागात वास्तव्याला असणारे एक हरीण शनिवारी दुपारी वाट चुकले आणि नांदा शिवारात गेले. नजरेस पडताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. शेवटी ते हरीण नांदा शिवारातील बबलू ठाकूर यांच्या शेताजवळ कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याचे लचके ताेडल्याने ते गंभीर जखमी झाले हाेते. वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या भागात हरणांची शिकार केली जात असून, मांस विक्री केली जाते. ही बाब वनविभागातील अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, कुणीही या गंभीर प्रकाराला आळा घालण्याचे धाडस करीत नाही किंवा या भागातील हरीण व रानडुकरांना पकडून दूरवर जंगलात साेडत नाही. या प्रकारामुळे वन अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.