दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:08 IST2021-04-27T04:08:57+5:302021-04-27T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती ...

The Deepali Chavan suicide case is an institutional murder | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोळसे पाटील म्हणाले, अत्यंत मागासलेल्या समाजातून येऊन स्वतःचे एक स्थान निर्माण करणारी दीपाली ही समाजासाठी आदर्शच होती. समाजातील अशा आदर्श म्हणून उभ्या राहणाऱ्या लोकांना अशी पावले उचलण्यासाठी सतत भाग पाडले गेले आहे. नोकरशाही मध्ये वरदहस्त नसणे, केवळ पगारावर जीवन अवलंबून असणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये हवी तशी एकी नसणे व जातीवाद्यांच्या बाजूला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे पाठबळ असणे, या त्याला खतपाणी घालणाऱ्या काही त्रोटक बाबी आहेत.

दीपालीच्या आत्महत्येनंतर पहिले प्रथम ती कोणत्या जातीची आहे, याचाच शोध जास्त झाला. तिची जात कळल्याबरोबर ती एक महिला आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.

रेड्डीला वाचविण्याचा प्रयत्न

रेड्डी याला वाचविण्याचा प्रयत्न उच्च पदस्थ नोकरशाह करीत आहेत. त्यांच्यावर केली जाणारी उच्च अधिकाऱ्यांमार्फतची चौकशी हा केवळ बनाव आहे. अत्यंत धूर्तपणे ही साक्षीदार आणि पुरावे बदलून प्रकरण कमजोर करतील व रेड्डीला सुटण्याचा मार्ग प्रशस्त करून देतील. दुसरा आरोपी शिवकुमार याला न्यायोचित शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठीच निष्पक्ष तपास आणि दर्जेदार अभियोजन याची गरज आहे. अटकपूर्व जामीन नाकारलेला असतानादेखील रेड्डीला अटक करण्याचे टाळून राज्य सरकार व पोलीस यंत्रणेने आपला खरा रंग दाखवलेला आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली. या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून त्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: The Deepali Chavan suicide case is an institutional murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.