दीपक बजाजची हायकोर्टात धाव
By Admin | Updated: October 10, 2015 03:22 IST2015-10-10T03:22:31+5:302015-10-10T03:22:31+5:30
भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा....

दीपक बजाजची हायकोर्टात धाव
अटकपूर्व जामीन अर्ज : शासनाला मागितले उत्तर
नागपूर : भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी शुक्रवारी बजाजच्या अर्जावर सुनावणी करून शासनाला १३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी बजाजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे तो उच्च न्यायालयात आला आहे. बजाज हा पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरी देण्याकरिताही त्याने लाखो रुपये घेतले. यामुळे २४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजाजचे निवासस्थान, शाळा, कार्यालय व इतर ठिकाणी धाड टाकली. दरम्यान, अधिकाऱ्यांना १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख व २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली. पथकाने २९ सप्टेंबर रोजी सोसायटीचे कार्यालय व सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेतली असता गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलिसांनी बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३ (२),१३ (१)(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. बजाजतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.