‘डी.एड.’ला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:09 IST2020-12-24T04:09:25+5:302020-12-24T04:09:25+5:30
नागपूर : २००५ पासून शासनाने शिक्षक भरती बंद केल्याने शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘डी.एड.’ अभ्यासक्रमाला गळती लागली. आज नागपूर ...

‘डी.एड.’ला लागली गळती
नागपूर : २००५ पासून शासनाने शिक्षक भरती बंद केल्याने शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘डी.एड.’ अभ्यासक्रमाला गळती लागली. आज नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता ४९ डी.एड. कॉलेजमध्ये असलेल्या २,५८२ जागांपैकी केवळ ३५५ प्रवेश झाले आहेत. विद्यार्थीच मिळत नसल्याने अनेक डी.एड. कॉलेज बंद पडले आहेत.
२००५ पर्यंत दहावीच्या मध्यम गुणवत्ताधारकांसाठी डी.एड.चा अभ्यासक्रम अतिशय लोकप्रिय होता. सरकारी नोकरीची १०० टक्के हमी असल्यामुळे गल्लोगल्ली डी.एड. कॉलेज सुरू झाली होती. परंतु शासनाने नोकरभरतीवर मर्यादा आणली आणि डी.एड. कॉलेजला विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. नागपूर जिल्ह्यात एकेकाळी ९८ डी.एड. कॉलेजेस होती. आजघडीला ४९ कॉलेज राहिली आहेत. बंद झालेल्या अनेक कॉलेजचे शिक्षक पोटासाठी चहा, पोह्यांचे स्टॉल, पिठाच्या गिरण्या लावून आपली उपजीविका करीत आहेत.
यात ८ कॉलेज अनुदानित असून, ४१ कॉलेज विना अनुदानित आहेत. जिल्ह्यात ४९ कॉलेजमध्ये यंदा २,५८२ जागा आहेत. आतापर्यंत डीएडच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून, ३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
- दृष्टिक्षेपात
- जिल्ह्यात डी.एड. कॉलेजची संख्या ९८ होती.
- सध्या ४९ डी.एड. कॉलेज कार्यरत आहेत.
- तीन फेरीत केवळ ३५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे.
- पूर्वी डी.एड. केल्यावर हमखास नोकरीची संधी होती. पण शासनाने शिक्षक भरती बंद केल्यानंतर डी.एड. प्रशिक्षित विद्यार्थी नोकरीसाठी वणवण भटकू लागला. डी.एड.केल्यापेक्षा रोजंदारीवर गेलेले बरे अशी भावना विद्यार्थ्यांची झाली. शासनाने या अभ्यासक्रमाकडे गांभीर्याने घेतले नाही.
डॉ. राजेश क्षीरसागर, प्राध्यापक
- १०, १२ विद्यार्थ्यांवर वर्ग सुरू
४९ अध्यापक विद्यालय असताना, विद्यार्थीच मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे १०, १२ विद्यार्थ्यांवरही अध्यापक विद्यालये सुरू आहेत. विना अनुदानित अध्यापक विद्यालयाची अतिशय वाईट स्थिती आहे. नावापुरते अध्यापक विद्यालये सुरू ठेवली आहेत.