कोरोनाबाधितांची शहरात घट, ग्रामीणमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:30+5:302021-05-24T04:07:30+5:30
नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील चार दिवसांपासून ग्रामीणमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ...

कोरोनाबाधितांची शहरात घट, ग्रामीणमध्ये वाढ
नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील चार दिवसांपासून ग्रामीणमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. रविवारी शहरात ३०० रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ७३२ रुग्ण व ७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १०४२ तर मृत्यूंची संख्या २४ वर पोहोचली. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांपासून शहरातील मृत्यूंची संख्या १०च्या आत आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असली तरी ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे. रविवारी १८,०१६ चाचण्या झाल्या. यातील १२,१६५ चाचण्या शहरात झाल्या असताना येथील पॉझिटिव्हिटी दर २.४६ टक्के होता. ग्रामीण भागात ५,८५१ चाचण्या झाल्या असताना पॉझिटिव्हिटी दर १२.५१ टक्के होता. २० मे रोजी ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या ५७८, २१ मे रोजी ५७६, २२ मे रोजी ६३१ तर आज ७३२ वर गेली. येथील मृत्यूसंख्या नियंत्रणात आली असली तरी रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे.
-रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के
नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर मार्च महिन्यात ७५ टक्क्यांवर असताना रविवारी तो ९५ टक्क्यांवर आला. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होऊ लागले आहेत. आज २,३२६ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ४,४८,३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येत मोठी घट आल्याने शासकीय खासगी रुग्णालयांतील ५० टक्के बेड रिकामे असल्याचे दिसून येत आहे.
-सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजारांहून १४ हजारांवर
जानेवारी महिन्यात कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या ३ ते ४ हजार होती. फेब्रुवारी महिन्यात ती वाढून ७ ते १८ हजारांच्या घरात गेली. मार्च महिन्यात ३० ते ३५ हजारांवर पोहोचली. एप्रिल महिन्यात तर कोरोनाचा कहर झाला. ही संख्या ७५ ते ७७ हजारांच्या घरात पोहोचली. मात्र, मे महिन्यापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतानाच रविवारी ही संख्या १३,९३४वर आली आहे. यातील ९,५४८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ४,३८६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत दाखल आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १८,०१६
शहर : ३०० रुग्ण व ७ मृत्यू
ग्रामीण : ७३२ रुग्ण व ७ मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७१,०५९
ए. सक्रिय रुग्ण : १३,९३४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,४८,३५७
ए. मृत्यू : ८,७६८