(निर्णयार्थ) थॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी लस निर्माण व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:21+5:302020-12-12T04:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या देशातील अनेक आजारांसाठी आजपर्यंत लस तयार झाली आहे. मात्र थॅलेसेमिया व सिकलसेल यांच्यासारख्या ...

(निर्णयार्थ) थॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी लस निर्माण व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशातील अनेक आजारांसाठी आजपर्यंत लस तयार झाली आहे. मात्र थॅलेसेमिया व सिकलसेल यांच्यासारख्या गंभीर आजारांसाठी अद्यापही ठोस उपचार नाहीत. आपल्या देशात या आजारांचे सुमारे ५ कोटी रुग्ण आहेत. या आजारांच्या निर्मूलनासाठी संशोधन करून लस निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून बोलत होते.
पूर्व विदर्भात या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. विकसित नसलेल्या मागास भागात ही संख्या अधिक असल्याचे आढळते. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याची आवश्यकता होती. सिकलसेलसाठीही वेगळी रक्तपेढी असली पाहिजे व रक्तदात्यांनी या रुग्णांसाठी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटलची संख्या अत्यंत कमी असून या हॉस्पिटलची संख्या कशी वाढेल तसेच औषधांसाठी येणारा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे काय, या रुग्णांच्या औषधांसाठी येणारा खर्च कमी करता येईल, यादृष्टीने अध्ययन करावे लागणार आहे. पंतप्रधान आयुष्यमान योजनेत ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन’चा समावेश करता येईल का व गरीब रुग्णांना ही सवलत देता येईल का यावरदेखील विचार आवश्यक आहे. यावेळी डॉ. विकी रुघवानी, डॉ. विनिता श्रीवास्तव, डॉ. केंद्रे, डॉ. जैन, डॉ. अरोरा व तेजस्विनी उमाळे उपस्थित होते