राज्यपाल बदलण्याचा निर्णय योग्यच -गडकरी
By Admin | Updated: June 21, 2014 02:42 IST2014-06-21T02:42:36+5:302014-06-21T02:42:36+5:30
सत्तापालट झाल्यानंतर राज्यांचे राज्यपाल बदलण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच आहे.

राज्यपाल बदलण्याचा निर्णय योग्यच -गडकरी
नागपूर : सत्तापालट झाल्यानंतर राज्यांचे राज्यपाल बदलण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच आहे. केंद्राचा तो अधिकार आहे. यापूर्वीही असेच घडले होते, असे मत व्यक्त करीत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यपाल बदलण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी गडकरी यांनी महालमधील केंद्रावर मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने सुरू केलेल्या राज्यपाल बदलण्याच्या प्रक्रियेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याचे समर्थन केले. राज्यपाल हा केंद्राचाच प्रतिनिधी असतो. केंद्रात सत्तापालट झाल्यास राज्यपाल बदलण्यात येतात. एनडीएची सत्ता गेल्यावर सत्तेवर आलेल्या युपीएनेसुद्धा राज्यपाल बदलले होते. पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा असून ती चांगली आहे, असे गडकरी म्हणाले.
इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. पदवीधर मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मी केलेल्या विकास कामांवर लोकांनी प्रेम केल्यानेच हे शक्य झाले. भाजपचे उमेदवार अनिल सोले यांना संधी मिळाली तर ते सुद्धा अशाच प्रकारचे काम करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)