कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST2021-08-28T04:12:45+5:302021-08-28T04:12:45+5:30
भिवापूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तणावात असलेल्या शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भिवापूर ...

कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या
भिवापूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तणावात असलेल्या शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भिवापूर येथे उघडकीस आली. माया भगवान भोयर (५६) रा. भिवापूर असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, माया यांची तालुक्यातील वासी-सेलोटी शिवारात सहा एकर शेती आहे. अल्पावधीतच पतीचे निधन झाल्यानंतर लहान मुलांना घेऊन माया भिवापूर येथे राहायला आली होती. कित्येक वर्षांपासून मोलमजुरी करून ती मुलांचे पालनपोषन करायची. त्यात उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ती गावातील सहा एकर शेती वाहत होती. त्यासाठी तिने राष्ट्रीयीकृत बँकेसह बचत गट व इतर ठिकाणाहून कर्जही घेतले. निसर्गाच्या चक्रव्यूहात पेरलं ते उगवत नसल्यामुळे कर्ज फेडायचे कसे, या प्रश्नामुळे ती मागील काही दिवसापासून तणावात होती. अशातच २५ रोजी माया घरून निघून गेली. शोधाशोध करून पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदविली. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास स्थानिक उदासी मठ परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत रेवतकर करीत आहेत.