कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 9, 2015 03:13 IST2015-10-09T03:13:55+5:302015-10-09T03:13:55+5:30
सततची नापिकी आणि वाढते कर्जबाजारीपण याला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
पारशिवनी : सततची नापिकी आणि वाढते कर्जबाजारीपण याला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (पारडी) शिवारात रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
शैलेश रंगारी (२८, रा. खंडाळा-पारडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शैलेश रंगारी यांच्या मालकीची खंडाळा (पारडी) शिवारात शेती आहे. ते शेतीवर कुटुंबाची उपजीविका करायचे. प्रतिकूल वातावारण आणि नापिकीमुळे पिकांचा उत्पादनखर्चही भरून निघत नसल्याने ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते.
त्यातच त्यांनी दहेगाव (जोशी) येथील आयडीबीआय बँकेकडून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेचा वापर त्यांनी पिकांच्या मशागतीसाठी केला. दरम्यान, याही वर्षी समाधानकारक पीक हाती येणार नसल्याची चिन्हे दिसू लागली होती. कर्जाचा बोझा वाढत असताना त्याची परतफेड कशी करायची, वर्षभराचा घर व शेतीचा खर्च कसा भागवायचा, ही चिंता त्यांना भेडसावत होती.दरम्यान, ते नेहमीप्रामणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. शेतातच त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने ही बाब घरच्या मंडळींच्या निदर्शनास येताच त्यांनी लगेच नागपूर येथल मेडिकल हॉस्पिटलध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान, मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
त्यांच्यापश्चात म्हातारी आई, पत्नी आणि सात महिन्यांची मुलगी आहे. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.