रेती वाहतुकीची रॉयल्टी विचारणाऱ्या तलाठ्यास जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:58+5:302021-02-09T04:09:58+5:30
पारशिवनी : रेती वाहतुकीच्या रॉयल्टीबद्दल विचारणा करणाऱ्या पारशिवनी येथील तलाठ्यास ट्रॅक्टरचालकाकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तलाठी कृष्णा ...

रेती वाहतुकीची रॉयल्टी विचारणाऱ्या तलाठ्यास जिवे मारण्याची धमकी
पारशिवनी : रेती वाहतुकीच्या रॉयल्टीबद्दल विचारणा करणाऱ्या पारशिवनी येथील तलाठ्यास ट्रॅक्टरचालकाकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तलाठी कृष्णा भास्कर माने यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरमालक नीलेश विठ्ठल वडस्कर (वय ४०, रा.चिचभवन, ता. पारशिवनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चिचभवन शिवारात रविवारी रात्री ७.४० वाजता ही घटना घडली.
तलाठी माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चिचभवन परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचोरी होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून ट्रॅक्टर अडविले. ट्रॅक्टरचालकाला रॉयल्टीबद्दल विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. तेवढ्यातच ट्रॅक्टरमालक नीलेश विठ्ठल वडस्कर घटनास्थळी आला. त्याने तलाठी कृष्णा माने व त्यांच्या सहकाऱ्यास शिवीगाळ करून जिवानिशी मारण्याची धमकी दिली. तसेच दोन्ही व्यक्तींचे हात पकडून त्यांना बाजूला केले. यानंतर ट्रॅक्टरमधील रेती तिथेच खाली करून ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. त्यानंतर तलाठी माने यांनी या प्रकरणाची तक्रार रविवारी रात्री पारशिवणी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार ट्रॅक्टरमालक नीलेश वडस्कर याच्यावर कलम ३५३, ३७९, ५०४, ५०६, ३४, नुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरमालक वडस्कर याचा पारशिवनी पोलीस शोध घेत आहेत.