ॲम्ब्युलन्सअभावी तडफडून मृत्यू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:21+5:302021-04-18T04:08:21+5:30
नागपूर : कोराेनाने नागपुरात थैमान घातले आहे. मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध हाेत ...

ॲम्ब्युलन्सअभावी तडफडून मृत्यू ()
नागपूर : कोराेनाने नागपुरात थैमान घातले आहे. मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध हाेत नसल्यानेही लोकांचे जीव जात आहेत. याचे ताजे उदाहरण शनिवारी मानेवाडा परिसरात दिसून आले. दक्षिण नागपुरातील योगेश्वरी नगरातील ६२ वर्षीय सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी सारथी कुमार सोनटक्के यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तब्बल पाच तासांपर्यंत ॲम्ब्युलन्स न आल्याने अखेर तडफडून घरीच मृत्यू झाला.
पीडब्ल्यूडी विभागातील निवृत्त कर्मचारी व दक्षिण नागपूर बसपाचे माजी प्रभारी सारथी कुमार सोनटक्के यांना शनिवारी सकाळी १० वाजता घरीच त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्यांच्या मुलांनी सकाळी १० वाजतापासून ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला. पोलीस प्रशासनालाही फोन केले, परंतु त्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. खाजगी ॲम्ब्युलन्सला फोन केल्यावर त्यांनी मेडिकलमध्ये पोहोचविण्यासाठी ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली. ही अवाजवी मागणी त्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने पूर्ण करता आली नाही. शेवटी संध्याकाळी ४ वाजता उपलब्ध झालेल्या सरकारी ॲम्ब्युलन्सने मेडिकल गाठले. मेडिकलच्या कॅझुल्टीमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आणि लगेच त्यांचे पार्थिव कोविड तपासणीच्या नावाखाली मर्च्युरीमध्ये पाठविण्यास सांगितले.
चौकट
बसपाने केला निषेध, आर्थिक मदतीची मागणी
बहुजन समाज पार्टीने या घटनेचा निषेध केला आहे. शासनासह पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन कितीही सतर्क असल्याचे सांगत असले तरी एका सर्वसामान्य व्यक्तीचा ॲम्ब्युलन्सअभावी तडफडून मृत्यू होणे ही नागपूरसारख्या उपराजधानीला लाजिरवाणी घटना आहे. शासनाने सोनटक्के परिवाराला १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व त्यांच्या परिवारातील मुलाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व या मृत्यूस जबाबदार असलेल्या बेजबाबदार मनपा व जिल्हाधिकारी शासन-प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणीही बसपाचे प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांनी केली आहे.