सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:33 IST2025-05-04T05:33:26+5:302025-05-04T05:33:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ती सात वर्षांची होती तेव्हा एका आजारामुळे तिला बहिरेपणा आला. बहिणीने तिला लिप रीडिंग ...

सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ती सात वर्षांची होती तेव्हा एका आजारामुळे तिला बहिरेपणा आला. बहिणीने तिला लिप रीडिंग शिकविले. त्या बळावर तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. एमपीएससी परीक्षा पास केली. नोकरी मिळविली. परंतु, बहिरेपणामुळे चूक घडू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिला कॉक्लिअर इम्प्लांटसाठी तयार केले. या शस्त्रक्रियेसाठी खासगी नाहीतर मेयोसारख्या शासकीय रुग्णालयावर विश्वास दाखविला. इएनटी विभागातील डॉक्टरांनी प्रथमच ३५ वर्षीय महिलेवर कॉक्लिअर इम्प्लांट यशस्वी केले.
राज्यातील शासकीय रुग्णालयामधील ही पहिली शस्त्रक्रिया ठरली, असा डॉक्टरांचा दावा आहे. जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया म्हणून २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आवाज ऐकणार आहे. शीतल लोणारे असे बहिरेपणाला हरविणाऱ्या महिलेचे नाव आहे.
पहिला आवाज ऐकणार बहिणीचा
२८ वर्षांनंतर पहिला आवाज कोणाचा ऐकणार, या प्रश्नावर तिने बहीण मीनलकडे बोट दाखविले. ज्या बहिणीने मला कष्टाने लिप रीडिंग शिकविले, तिचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे आणि प्रत्युत्तर म्हणून तिला मीनल म्हणूनही हाक मारायचे असल्याचे तिने खाणाखुणा करून सांगितले.
...अन् ऐकण्याची क्षमता गमावली
शीतल इयत्ता पहिलीत असताना गालफुगीमुळे तिने ऐकण्याची क्षमता गमावली. उपचारांनंतरही तिची श्रवणशक्ती परत आली नाही. तिचे वडील पुरणदास लोणारे यांनी मेयोमधील कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्याशी संपर्क साधला. मेयोमध्येच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
राज्यातील शासकीय रुग्णालयांत मेयोमध्ये पहिल्यांदाच प्रौढ व्यक्तीवर कॉक्लिअर इम्प्लांट झाले. पहिल्यांदाच ‘स्मार्ट नॅव्हिगेशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला. शस्त्रक्रियेत कॉक्लिअर इम्प्लांटचा इनर पार्ट लावण्यात आला. दोन आठवड्यांनंतर आऊटर पार्ट लावण्यात येईल. त्यानंतर ती ऐकू शकणार आहे.
डॉ. जीवन वेदी, प्रमुख इएनटी विभाग मेयो.