उत्तर सादर करण्यासाठी केसीसीने मागितली मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:59+5:302021-02-13T04:09:59+5:30
हिंगणा: हिंगणा तालुक्यातील मौजा कवडस आणि मौदा पेंढरी येथील खदाणीतून गौण खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी नागपूर येथील खळतकर ...

उत्तर सादर करण्यासाठी केसीसीने मागितली मुदत
हिंगणा: हिंगणा तालुक्यातील मौजा कवडस आणि मौदा पेंढरी येथील खदाणीतून गौण खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी नागपूर येथील खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनीला (केसीसी) ३४ कोटी ९५ लाख १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस तहसीलदार संतोष खांडरे यांनी बजावली आहे. याप्रकरणी कंपनी मालक निहार जयंत खळतकर आणि संजय चंद्रशेखर इंगळे यांना हिंगणा तहसील कार्यालयात ११ फेब्रुवारीला आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी केसीसी कंपनीचे निहार जयंत खळतकर तहसील कार्यालयात उपस्थित झाले. कंपनीवर उत्खनन प्रकरणी आकारण्यात आलेला दंड अकल्पनीय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. खदानीचे मोजमाप व रॉयल्टी भरल्याचा हिशेब सादर ३० दिवसांचा अवधी त्यांनी तहसीलदारांना मागितला आहे. तहसीलदार संतोष खांडरे यांनी यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत केसीसीला दिली आहे.
कवडस शिवारात असलेल्या गिट्टी खदाणीतून आवश्यकतेपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी येथे धाड टाकली होती. या कंपनीला शेत सर्वे नं.२२५/१ मधील २.८० हेक्टर आर. क्षेत्रामध्ये २८ हजार ब्रास दगड, मुरुम, बोल्डर या गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली होती. येथे मात्र ५८,०७६.८५ ब्रास गौण खनिजाचे खोदकाम करण्यात आल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. येथे सदर कंपनीने ३०,०७७ ब्रास अवैध गौण खनिजाचा उपसा केला आहे. याप्रकरणी सदर कंपनीवर ३० कोटी ०७ लाख ७० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. यासोबतच मौजा पेंढरी येथील सर्व्हे नंबर ९२ मधून ७,६०० ब्रास मुरुम खोदकाम व वाहतुकीची परवानगी सदर कंपनीकडे होती. येथे १७,३४८.४७ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. या खदाणीतून ९७४८.४७ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.