DCM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर राजकीय पक्ष पुन्हा एकत्र दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी उद्धव यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी नागपुरात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघेही फडणवीस यांच्या दालनात भेटले. काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. याच भेटीवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
"चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधीपक्ष आणि विरोधी पक्षाचे नेतेही भेटतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे २०१९-२० मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतात. लोकसभेच्या विजनानंतर ते एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचे वाटपही केलं होतं आणि म्हणाले तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकू. पण आता त्यात आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणे काही गैर नाही. पण याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्यादिवशी घरी थेट ही परंपरा आहे," अशी खोचक टिप्पणी शिंदेंनी केली आहे.
"काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करू नये. निकालाविरोधात लागला म्हणून विरोधकांनी टीका करू नये. ईव्हीएमवर आरोप करणे बंद करावे. निकाल विरोधात लागला म्हणून त्यांना आता ईव्हीएम आठवले आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना न्याय देण्यावर विरोधकांनी भर द्यावा," असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.
"विधिमंडळाचं सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. सभागृहाबाहेर नौटंकी करण्यासाठी नव्हे. तिथे पायऱ्यांवर बसून नौटंकी केली जाते. यातच त्यांना समाधान वाटतं. मात्र ते करण्याऐवजी त्यांनी सभागृहात येऊन लोकांचे प्रश्न मांडावे. आता हिवाळी अधिवेशन विदर्भात चालू आहे तर विरोधकांनी विदर्भाच्या लोकांसाठी भांडावं," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.