बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा मुलीने केला खात्मा; नागपूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 20:54 IST2021-05-17T20:54:18+5:302021-05-17T20:54:58+5:30
Nagpur News बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा १७ वर्षीय मुलीने लाकडी दांड्याने तोंडावर वार करून खून केला. हिंगणा तालुक्यातील सावळी बीबी येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (६०) असे मृताचे नाव आहे.

बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा मुलीने केला खात्मा; नागपूर जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलाचा १७ वर्षीय मुलीने लाकडी दांड्याने तोंडावर वार करून खून केला. हिंगणा तालुक्यातील सावळी बीबी येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (६०) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याने १५ वर्षांपूर्वी वंदना या महिलेशी विवाह केला होता. त्यावेळी वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. काही दिवस सावळी या गावात ज्ञानेश्वर व वंदना एकत्रित राहिल्यानंतर तो खापरी ता. सेलू (जि. वर्धा) येथे राहायला गेला होता. अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे यायचा. इथे आल्यानंतर तो पत्नी वंदना व सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारीही सकाळी ११ वाजता तो सावळी येथे दारू पिऊन आला. सावत्र मुलीशी बळजबरी करून त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीलासुद्धा ऐकत नव्हता. मुलीला हे सहन न झाल्याने भांडण झाले.
यात मुलीने लाकडी दांडा उचलून ज्ञानेश्वरच्या तोंडावर मारला. घाव बसताच तो घराच्या अंगणातच खाली पडला. रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारिन दुर्गे, सहायक पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, पोलीस कर्मचारी विनोद कांबळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यासोबत मृताची पत्नी वंदना व १७ वर्षीय विधिसंघर्ष मुलीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर अपर पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, परिमंंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांनीही घटनास्थळी दाखल होत खुनाची माहिती जाणून घेतली.
ज्ञानेश्वरला चार वर्षाचा झाला होता तुरुंगवास
मृत ज्ञानेश्वर गडकर याने २०१६ मध्ये अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात त्याच्यावर ३७६ व पोक्सोनुसार गुन्हा दाखल होऊन त्याला १५ जानेवारी २०२१ ला चार वर्षांचा तुरुंगवास झाला होता. मात्र तो जानेवारी महिन्यातच शिक्षा संपण्यापूर्वी परतला होता. तेव्हापासूनच त्याने या मायलेकींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याबद्दल वंदना हिने २० जानेवारी २०२१ ला हिंगणा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर विरुद्ध तक्रारही दाखल केली होती.