दत्ताभाऊ म्हणजे दाताभाऊ, एका दातृत्वपर्वाची अखेर
By योगेश पांडे | Updated: March 23, 2026 04:43 IST2026-03-23T04:41:58+5:302026-03-23T04:43:45+5:30
झालेत बहु, होतील बहु..पण यासम हाच....गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे अनोखे शिक्षणमहर्षी

दत्ताभाऊ म्हणजे दाताभाऊ, एका दातृत्वपर्वाची अखेर
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात आणि महाराष्ट्रात अनेक शिक्षणसम्राट झाले, अनेकांनी महाविद्यालयांची साखळी उभी केली, हजारो विद्यार्थी घडवले. पण समाजातील सर्वात शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला, अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये दत्ता मेघे यांचे नाव अग्रस्थानी राहील. विदर्भाला कर्मभूमी मानणारे दत्ता मेघे यांनी समाजातील सर्वच वर्गांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी झटत ते खऱ्या अर्थाने ‘दातृ’महर्षी होते हे दाखवून दिले. दत्ता मेघे यांच्याकडे कुणी अडचणीत गेला आणि तो रिकाम्या हाताने तेथून बाहेर पडला असे कधीच झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असोत, त्यांच्या अनेक शिक्षणसंस्थांतील शिक्षक-कर्मचारी असोत की अगदी कुठलीही ओळख नसताना त्यांच्या दातृत्वामुळे स्वत:च्या पायावर उभा असलेला गरीब घरातील आताचा सनदी अधिकारी असो, प्रत्येकाच्या मनात एक रूखरूख आणि झालेत बहु, होतील बहू...पण यासम हाच हीच भावना दिसून येत आहे.
गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर, संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी ते जणू देवदूतच ठरले. एखाद्याच्या मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून फी भरून देणे, रुग्णालयात उपचारासाठी पैसे देणे, शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देणे, किंवा एखाद्या विधवेला संसार उभा करण्यासाठी आधार देणे, या सर्व गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये या तत्वावर ते आयुष्य जगले. विदर्भाला कर्मभूमी मानून आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि दातृत्वाचा दीप तेवत ठेवणारे दत्ताभाऊ आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने एका दातृत्वपर्वाचीच अखेर झाल्याची वेदना समाजाच्या प्रत्येक स्तरावरून व्यक्त होत आहे.
ना पक्ष, ना ओळख केवळ मानवतेचा चेहरा
दत्ता मेघे यांनी राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर जात सर्वच पक्षाच्या लोकांना स्वत:हून मदत केली. त्यांच्याकडे दररोज सकाळपासूनच विविध अडचणी घेऊन लोक पोहोचायचे. त्यांना भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट वगैरेंची गरजच पडली नाही. अगदी फाटक्या कपड्यातील व्यक्तीदेखील तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात थेट जाऊ शकत होता. कुठलाही पक्ष किंवा ओळख याची गरज लागत नव्हती. त्यांना केवळ मानवतेचाच चेहरा माहिती होता. अगदी साधारण कार्यकर्ता असताना ते महालातील एका पानठेल्यावर जायचे. अनेक वर्षांनी आठवण ठेवून त्यांनी त्याच्या मुलाला बोलावून एका महाविद्यालयात चांगली नोकरी लावून दिली. मुरलीधर डोईफोडे हे समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या अपघात झाल्यानंतर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत दत्ता मेघे यांनी हरतऱ्हेने त्यांची मदत केली. इतकेच नाही तर डोईफोडे यांच्या निधनानंतरदेखील त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार दिला. अशा अनेक कुटुंबांनी दत्ता मेघे यांच्या दातृत्वाचा अनुभव घेतला. आज ते नसले तरी त्यांच्या याच दातृत्वामुळे त्यांचे नाव जनसामान्यांच्या मनात अमर झाले आहे अशी भावना माजी उपमहापौर व दत्ता मेघे यांचे निकटवर्तीय रघुनाथ मालीकर यांनी व्यक्त केली.
१०० टक्के समाजकारणच
राजकारणापेक्षा १०० टक्के समाजकारण हाच दत्ता मेघे यांच्या कार्याचा मंत्र होता व तो त्यांनी आयुष्यभर जपला. एरवी तथाकथित शिक्षण सम्राटांकडून संस्थामध्ये नोकरीवर लावण्याचेदेखील कमिशन घेतले जाते. मात्र दत्ता मेघे एकीकडे अनेक गरीब मुलांना मोफत प्रवेश देत असतानाच दुसरीकडे अनेकांना चांगल्या नोकरीदेखील लावून दिल्या. मात्र त्यांनी कधीही कुणाकडून पाच पैसेदेखील घेतले नाही. तत्वांशी कधीही तडजोड करायची नाही हे ब्रीद त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपले.
दरवर्षी वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन
दत्ता मेघे यांची नाळ जमिनीशीच जुळली होती. त्यांच्या प्रेरणेतून समीर व सागर मेघे यांनी साई अनाथाश्रम सुरू केला. दत्ता मेघे स्वत: रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमासोबत जुळले होते. दर वर्षी दत्ता मेघे यांच्या वाढदिवशी अनाथाश्रम व विमलाश्रमातील मुला-मुलींसोबतच पहिले सेलिब्रेशन व्हायचे. त्यांनी आयुष्यभर दिलं, तेही न बोलता, न मिरवता आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्यांनी लावलेले दातृत्वाचे बीज आज अनेकांच्या मनात रुजले आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण सामाजिक कार्यात पुढे येत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरेल, असे मालीकर यांनी सांगितले.