विवाह संकेतस्थळावर ओळखी; लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार
By योगेश पांडे | Updated: December 15, 2023 21:36 IST2023-12-15T21:36:22+5:302023-12-15T21:36:57+5:30
राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विवाह संकेतस्थळावर ओळखी; लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर एका आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. लग्नाची विचारणा केल्यावर त्याने नकार दिला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विशाल सुखदेव घोरेश्वर (२९, मूर्तिजापूर, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. त्याची २९ वर्षीय विवाहेच्छुक तरुणीसोबत मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर ओळख झाली. विशालने तिच्याशी संपर्क केला व लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली. १५ एप्रिलला ते नागपुरात आले. प्रतापनगर येथील एका हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. तिथे दोन दिवसांसाठी रूम बुक केली. येथे लग्नाचे आमिष दाखवत विशालने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
नागपूरहून परतल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला. तो पीडितेशी बोलणे टाळू लागला. लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ सुरू केली व लग्नास नकार दिला. पीडितेने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशालचा शोध सुरू केला आहे.