धंतोलीतील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: October 14, 2015 03:34 IST2015-10-14T03:34:27+5:302015-10-14T03:34:27+5:30
महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धंतोलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेऊन परिसरातील सहा अतिक्रमण हटविण्यात आले.

धंतोलीतील अतिक्रमण हटविले
नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धंतोलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेऊन परिसरातील सहा अतिक्रमण हटविण्यात आले.
धंतोलीच्या यशवंत स्टेडियमजवळील फारुखा भवनाच्या पार्किंगमध्ये नांगिया मोटर्सचे गोडाऊन आहे. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना पार्किंगच्या जागेवर अनधिकृत गोडाऊन असल्याची तक्रार मिळाल्यामुळे येथील जाळी आणि लोखंडाच्या ग्रीलसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. यासोबतच एचडीएफसी बँक आणि एका हॉटेलसमोरील अतिरिक्त फ्लोरिंग तोडण्यात आले. त्यानंतर गणेश चेंबरच्या बेसमेंटमधील वऱ्हाडी हॉटेलच्या काही अनधिकृत खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले. याशिवाय सराफ बिल्डिंगच्या गणेश सागर नावाच्या प्रतिष्ठानासमोरील शेड हटविण्यात आले. त्यानंतर अमर पॅलेसच्या पार्किंगमधील एका बिल्डरच्या कार्यालयासह दोन खोल्या पाडण्यात आल्या. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना एका महिलेने विरोध केल्यामुळे घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमणधारकांवर १५ हजाराचा दंड आकारण्यात आला. (प्रतिनिधी)