चाकूच्या धाकावर बालिकेसोबत विकृत चाळे, आरोपीचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: November 12, 2016 02:54 IST2016-11-12T02:54:23+5:302016-11-12T02:54:23+5:30
चाकूच्या धाकावर एका बालिकेसोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश

चाकूच्या धाकावर बालिकेसोबत विकृत चाळे, आरोपीचा जामीन फेटाळला
नागपूर : चाकूच्या धाकावर एका बालिकेसोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
शैलेश भोजराज यादव, असे आरोपीचे नाव असून तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरी कॉलनी येथील रहिवासी आहे.
पीडित बालिका आपल्या घराच्या दारात खेळत असताना आरोपीने तिचा विनयभंग करून बलात्काराच्या हेतूने चाकूचा धाक दाखवून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी राणाप्रतापनगर पोलिसांनी भादंविच्या ३५४ ए, ३५४ बी, ५०६ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या कलम ७ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताच सरकार पक्षाच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. आरोपी हा लैंगिक गुन्ह्याच्या सवयीचा असून तो समाजासाठी घातक आहे. त्याने अशाच प्रकारचे गुन्हे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले आहेत. तो लैंगिकरीत्या विक्षिप्त आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)