कोरोनाबाधितांना रोज ५३० रेमडेसिवीरचा डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:26 IST2020-12-16T04:26:34+5:302020-12-16T04:26:34+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : ‘डब्ल्यूएचओ’ व ‘आयसीएमआर’ने रेमडेसिवीर परिणामकारक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसाच्या ...

कोरोनाबाधितांना रोज ५३० रेमडेसिवीरचा डोज
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘डब्ल्यूएचओ’ व ‘आयसीएमआर’ने रेमडेसिवीर परिणामकारक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसाच्या आत रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे आजही नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना रोज जवळपास ५३० वर रेमडेसिवीरचा डोज दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनचा ७५७७ साठा उपलब्ध आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचा संसर्गाचा दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात हे औषध परिणामकारक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नेही (आयसीएमआर) या इंजेक्शनच्या जास्त वापराने आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु कोरोनावर खात्रीलायक अद्यापही उपचार नाहीत. रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याचा अनुभव डॉक्टरांच्या पाठिशी आहे. यामुळे याचा वापर होत आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ५७७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील १४४९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचाराखाली आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना रेमडेसिवीरचा डोज दिला जात असल्याची माहिती आहे.
-सप्टेंबर महिन्यात रोज लागत होते २२०० इंजेक्शन
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली. ‘एफडीए’नुसार एकट्या सप्टेंबर महिन्यात रोज जवळपास २२०० ते २३०० इंजेक्शनचा वापर होत होता. सध्या हे प्रमाण कमी झाले असून ५३० वर आले आहे.
-इंजेक्शनवर रोज १२ लाखांचा खर्च
ऑगस्ट महिन्यात रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने तुटवडा पडून काळाजबाजारही वाढला होता. परंतु शासनाने ठाराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने आणि ‘एफडीए’नेही इंजेक्शनची मागणी व साठा यावर लक्ष ठेवल्याने यावर नियंत्रण मिळविण्यास यश आले. सध्याच्या स्थितीत या इंजेक्शनवर रोज साधारण १२ लाखांचा खर्च होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-रेमडेसिवीरचा आवश्यक साठा उपलब्ध
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी कमी झाली आहे. सध्या रोज जवळपास ५३० इंजेक्शनचा वापर होत आहे. नागपूर जिल्ह्यासाठी ७५७७ इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याने तूर्तास तरी तुटवडा नाही.
-महेश गडेकर
सहआयुक्त, एफडीए