दीक्षाभूमीला प्रेरणाभूमी बनविणारे ‘दादासाहेब’
By Admin | Updated: July 26, 2015 02:59 IST2015-07-26T02:59:38+5:302015-07-26T02:59:38+5:30
अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला.

दीक्षाभूमीला प्रेरणाभूमी बनविणारे ‘दादासाहेब’
बौद्ध जगताला मिळाली अनुपम भेट
आनंद डेकाटे नागपूर
अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी पहिल्यांदा डोळे उघडले, ती तथागत गौतम बुद्धांची पहिली दीक्षाभूमी.
सम्राट अशोकाने जगभर या धम्माचा प्रचार- प्रसार करून त्याला गतिमान केले. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला ती दुसरी दीक्षाभूमी. बुद्धाचा विज्ञानवादी धम्म नव्या आयामातून बाबासाहेबांनी लक्षावधी अस्पृश्यांना देताना नागपूरची जागा निवडली, तीच दीक्षाभूमी आज समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित ही प्रेरणाभूमी उभारण्यात रा.सू. उपाख्य दादासाहेब गवर्इं यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे सातत्य आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीवरील जागतिक दर्जाच्या स्मारकाची अनुमप भेट बौद्ध जगताला मिळाली आहे.
डॉ. आंबेडकरांनी तथागतांचा धम्म दिल्यानंतर अल्पावधीतच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. परंतु त्यांच्या अस्थिधातून दीक्षाभूमीवर आजही बाबासाहेबांचे प्रतिबिंब दिसते. यामुळेच लाखोंचा जनसमुदाय अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीची माती कपाळाला लावण्यासाठी येतो. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या ठिकाणी सध्या जागतिक दर्जाचे भव्य स्तुप उभे आहे. आधुनिक आणि पारंपरिक शिल्पकलेचा ती उत्त्कृष्ट अशी वास्तू ठरली. १२० फूट व्यासाचा हा स्तुप आतून पोकळ आहे.
रा.सू. गवई यांची दूरदृष्टी
नागपूर : जगभरातील सर्व स्तुपांमध्ये पोकळ स्तुप म्हणून दीक्षाभूमीचे वेगळेच महत्त्व आहे. इंटरलॉकिंग पद्धतीने घुमट तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. २११ बाय २११ च्या चौरस बांधकामामध्ये पहिला मुख्य घुमट आहे.
फ्लोरिंंगसाठी राजस्थानी संगमरवर वापरण्यात आले आहे. स्तुपाच्या चारही दरवाजांवर सांचीच्या शैलीतील देखण्या कमानी आहेत. त्यावरील धम्मचक्र, घोडे, हत्ती, शिंग यांचे शिल्प कोरल्याने त्याला प्राचीन बाज मिळाला आहे. जुलै १९७८ मध्ये दीक्षाभूमीचा पायाभरणी सोहळा पार पडला.
सांचीच्या जगप्रसिद्ध स्तुपावरून दीक्षाभूमीचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी आपल्या नागपूरच्याच वास्तुविशारद शिवदानमल यांची निवड करण्यात आली. ती मुळातच दादासाहेबांमुळेच. रा.सू. गवई यांची चिकाटी आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीची नाळ बौद्ध जगताशी जोडल्या गेली आहे.
म्युरल्सचे स्वप्न अजूनही अपूर्णच
दीक्षाभूमी हे बुद्धिस्ट सेमिनरी व्हावी, असे दादासाहेबांचे स्वप्न होते. त्यादिशेने ते शासनाच्या मदतीतून एकेक पाऊल टाकत होते. दीक्षाभूमीच्या परिसरात मध्यवर्ती स्मारक झाले. सभागृहाचे बांधकामही जवळपास पूर्ण झाले. यात्री निवास तयार झाले आहे. २२ प्रतिज्ञांचा स्तंभ आणि संविधान प्रास्ताविकतेचा शिलालेखसुद्धा उभारले गेले. परंतु यासोबतच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचे जीवनचरित्र ‘म्युरल्स’च्या माध्यमातून दीभाभूमीतील भव्य स्तुपात उभारण्याचा त्यांचा संकल्प होता. स्मारक समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्याबाबत गवई यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्या म्युरल्सच्या कामाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही.
संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख
सध्या देशात जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावाद प्रचंड उफाळलेला दिसून येतो. स्वत:ला राष्ट्रीय नेते म्हणवणारे लोकही राष्ट्रहितापेक्षा प्रांत आणि भाषेला अधिक महत्त्व देतात. ते भारतीय संविधानाला महत्त्व देत नाही. परंतु अशा वेळी न कळतच ‘मी प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीयच’ अशी स्वत:ची ठामपणे ओळख करून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. राष्ट्रीयत्वाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठीसुद्धा राष्ट्रीय हित हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच दीक्षाभूमीवर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचा शिलालेख कोरण्यात आला. देशाच्या संविधान प्रास्ताविकतेचा शिलालेख कोरणारे दीक्षाभूमी हे देशातील एकमेव स्मारक ठरले आहे. या शिलालेखाची संकल्पनाच रा.सू. गवई यांची होती. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा शिलालेखही दीक्षाभूमीच्या परिसरात दिमाखात उभा आहे.