नोकरीच्या नावाखाली सायबर गुलामगिरी : शिक्षित तरुणांवर गंडा!
By योगेश पांडे | Updated: August 11, 2025 15:42 IST2025-08-11T15:39:02+5:302025-08-11T15:42:07+5:30
Nagpur : मोठ्या पॅकेजच्या नावाखाली अनेक तरुण सायबरच्या दलदलीत

Cyber slavery in the name of employment – a scam on educated youth!
डॉ. योगेश पांडे
नागपूर : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणात वाढले असून, अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यत आरोपी 'टार्गेट' शोधत असतात. बरेचसे रॅकेट हे विदेशातून 'ऑपरेट' होत असून, तंत्रज्ञानाचा यात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चे युग असले तरी प्रत्यक्ष 'टार्गेट' शी संपर्क साधण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून उच्च शिक्षित तरुणांना 'टार्गेट' करण्यात येत आहे. चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना तीन ते चार देशांत पाठविले जाते.
तेथे तरुण गेले की त्यांचे दस्तावेज ताब्यात घेत या टोळ्यांकडून त्यांना अक्षरशः 'सायबर गुलाम' बनविण्यात येते. त्यानंतर त्यांनाच ऑनलाइन माध्यमातून सायबर गुन्हे करायला भाग पाडले जाते. देशातील अनेक शहरांमधील तरुणांसोबत हे प्रकार घडले असून, अनेक जण तर बदनामीच्या व शिक्षा होईल या भीतीपोटी सायबर गुन्हेगारांची छळवणूक सहन करत असल्याचे दिसून येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सर्वसाधारणतः चीन, कंबोडिया, म्यानमार, लाओस येथून काम करतात. त्यांचे नेटवर्क अगदी स्थानिक पातळीपर्यंत असते. विविध कामांसाठी ज्याप्रमाणे एजंट असतात, त्याचप्रमाणे 'टार्गेट' सोबत संपर्क साधण्यासाठी टेक्नोसॅव्ही तरुणांचादेखील ते शोध घेत असतात. या तीन ते चार देशांमध्ये चांगल्या पगाराचे आमिष दाखवून अशा तरुणांना या टोळ्या जाळ्यात फसवितात. तरुण तेथे पोहोचले की कंपनीच्या प्रोटोकॉलचे कारण देत त्यांच्याकडून पासपोर्ट व इतर महत्त्वाचे दस्तावेज घेतले जातात.
ऑनलाइन'च करतात जाहिरात
सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या 'सायबर गुलाम' शोधण्यासाठी टीअर-२ व टीअर-३ शहरांमधील तरुणांवर जास्त भर देतात. या शहरांमध्ये अनेकांना हवा तसा रोजगार मिळत नाही. त्यामुळे तेथील उच्च शिक्षित व टेक्नोसॅव्ही तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. सायबर गुन्हेगार एखाद्या तथाकथित कंपनीच्या नावाखाली ऑनलाइन किंवा सोशल माध्यमांची मदत घेत जाहिरात करतात. बाहेरील देशात नोकरीची ऑफर मिळत असल्याने तरुणदेखील या जाळ्यात अलगद अडकतात. संबंधित कंपनीची योग्य शहानिशा केली नाही तर भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.