बिल्डरला ग्राहक न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 02:40 IST2016-08-14T02:40:41+5:302016-08-14T02:40:41+5:30

त्रिमूर्तीनगर पठाण ले-आऊट येथील रहिवासी फ्लॅटधारक जयवंत नलोडे यांना १२ लाख रुपये व्याजासह

Customer Criminal Court of Builder | बिल्डरला ग्राहक न्यायालयाचा दणका

बिल्डरला ग्राहक न्यायालयाचा दणका

१२ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश : फ्लॅट बनविताना नकाशात केला बदल
नागपूर : त्रिमूर्तीनगर पठाण ले-आऊट येथील रहिवासी फ्लॅटधारक जयवंत नलोडे यांना १२ लाख रुपये व्याजासह तसेच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासापोटी २५ हजार रुपये मानकापूर सादिकाबाद येथील प्रभू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक प्रमोद मिश्रा यांनी द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य नितीन घरडे आणि चंद्रिका बैस यांनी दिला.

प्रकरण असे की, नलोडे हे मोरारजी टेक्स्टाईल्समध्ये नोकरी करतात. त्यांनी घर विकत घेण्याचा विचार करून आयडीबीआय बँकमार्फत १४ सप्टेंबर २००५ रोजी १२ लाख रुपये घेण्याचे ठरवले होते. त्यांनी बिल्डर मिश्रा यांच्या प्रभू ब्रह्मा अपार्टमेंट मध्ये ३०२ क्रमांकाचा फ्लॅट आरक्षित केला होता. या फ्लॅटबाबतचे कागदपत्र आणि नकाशा बिल्डरने नलोडे यांना दिला होता. प्रत्यक्ष फ्लॅट बनविताना बिल्डरने मोठ्या प्रमाणावर फेरफार केला होता. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
त्याबाबतचे हप्ते नलोडे यांच्या खात्यातून वजा केले जात होते. संपूर्ण रक्कम वसूल करूनही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नव्हता. शिवाय पैसेही परत केले जात नव्हते. यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. नलोडे यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करताच त्यावर सुनावणी होऊन बिल्डरने तक्रारकर्त्यास रक्कम घेतल्यापासून १२ लाख रुपये दरसाल दर शेकडा १२ टक्के व्याज दराने द्यावे, झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासापोटी २५ हजार व तक्रारीचा खर्च ५ हजार द्यावे, असे मंचाने आपल्या आदेशात नमूद केले. मंचपुढे तक्रारकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. विलास डोंगरे, अ‍ॅड. ज्योती डोंगरे तर बिल्डरच्या वतीने अ‍ॅड. राकेश द्विवेदी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Customer Criminal Court of Builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.