उपराजधानीत अवतरली राजस्थानची संस्कृती : पधारो म्हारो देस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:31 IST2018-12-22T00:26:09+5:302018-12-22T00:31:00+5:30
राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झाले. देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या राजस्थानी संस्कृतीच्या सौंदर्याचा शुक्रवारी नागपूरकरांनी अनुभव घेतला. उपराजधानीत राजस्थानची संस्कृतीच अवतरल्याचा अनुभव यावेळी आला.

उपराजधानीत अवतरली राजस्थानची संस्कृती : पधारो म्हारो देस...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झाले. देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या राजस्थानी संस्कृतीच्या सौंदर्याचा शुक्रवारी नागपूरकरांनी अनुभव घेतला. उपराजधानीत राजस्थानची संस्कृतीच अवतरल्याचा अनुभव यावेळी आला.
सिव्हील लाईन्स येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामसुंदर सोनी, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ़ गिरीश गांधी, पंचायतच्या विश्वस्त समितीचे सभापती गिरधरलाल सिंगी, सचिव सुबोध मोहता, पंचायत अध्यक्ष प्रमोद बागडी, प्रकल्प संयोजक प्रतीक बागडी, सचिव अजय मल्ल, युवा समिती अध्यक्ष शिरिष मुंधडा, सचिव दीपक मोहता, महिला समिती अध्यक्ष वंदना मुंधडा, सचिव रेखा राठी उपस्थित होते़ महेशपूजन व महेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़
राजस्थानात भक्ती, शक्ती आणि शौर्याचा अनुपम संगम असून, तेथे असणारे किल्ले स्थापत्यशास्त्राचे अद्भूत नमुने आहेत़ या महोत्सवातून महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये राजस्थानबद्दलचे आकर्षण नक्कीच वाढेल. तसेच ज्या पद्धतीने समाजातील तरुण राजस्थानची संस्कृती नागपूरसह इतर शहरांपर्यंत नेत आहे, ते पाहता पर्यटनात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास श्यामसुंदर सोनी यांनी व्यक्त केला़ राजस्थानला वैभवशाली वारसा लाभला आहे. त्यामुळे त्याची जपणूक झालीच पाहिजे.
उद्घाटनाच्या अगोदर राजस्थानी समाजातील तरुणांच्या समूहाने पारंपारिक राजस्थानी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.
गायन, वादन, नृत्याचे सादरीकरण
उद्घाटन कार्यक्रमानंतर राजस्थानमधील उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलात्मक सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी कलाकारांनी राजस्थानी लोककलेत गायन, वादन व नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले. या महोत्सवात राजस्थानची पाककला, हस्तकला, शिल्पकला हेदेखील आकर्षणाचे केंद्र आहेत.