नागपुरात आमदारकीसाठी नगरसेवकांतून इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:33 PM2019-09-16T23:33:25+5:302019-09-16T23:35:26+5:30

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

A crowd of aspirants from corporators for MLAs in Nagpur | नागपुरात आमदारकीसाठी नगरसेवकांतून इच्छुकांची गर्दी

नागपुरात आमदारकीसाठी नगरसेवकांतून इच्छुकांची गर्दी

Next
ठळक मुद्देभाजपासोबतच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपातून अनेक दावेदार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अनेक नगरसेवकांनी उमेदवारीसाठी दावा केला असून, निवडणुकीची तयारी सुरू केल्याने काही मतदार संघातील विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपद भूषविले आहे. वन राज्यमंत्री परिणय फुके, आमदार प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, नाना श्यामकुळे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये नगरसेवक होते. माजी आमदार मोहन मते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात नगसेवकांतून अनेक जण आमदार, मंत्री झाल्याने विद्यमान नगसेवकांतील अनेकांची आमदार होण्याची इच्छा आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर, चेतना टांक, काँग्रेसकडून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, पुरुषोत्तम हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे आदी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. काहींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे, तर काहींनी इच्छा असूनही आमदारांची नाराजी नको म्हणून उमेदवारीसाठी दावा करण्याचे टाळले आहे.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी भाजपाचे नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, दीपक चौधरी इच्छुक आहेत. या सर्वांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे संजय महाकाळकर तयारीला लागले आहेत. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आल्यास, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत.
पश्चिम नागपुरात यावेळी भाजपातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक दयाशंकर तिवारी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांचीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदार संघातून भाजपा शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक प्रवीण भिसीकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर, अपक्ष नगरसेवक आभा पांडे यांनीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून नगरसेवक अ‍ॅड. धरमपाल मेश्राम, संदीप जाधव निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे यांनी दावा केला आहे. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांचीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे.

दक्षिण-पश्चिममध्ये सत्तापक्षात इच्छुक नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातून भाजपाकडून कुणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. मात्र काँग्रेसकडून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, रेखा बाराहाते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रफुल्ल गुडधे हे यापूर्वीही निवडणूक लढले आहेत.

नगरसेवकांतून घडले प्रभावी व्यक्तिमत्त्व
गतकाळात महापालिका नगरसेवकांतून माजी महापौर बॅरिस्टर शेषराव वानखडे, तेजसिंगराव भोसले, भाऊ साहेब सुर्वे, भाऊ मुळक, कृष्णराव पांडव असे प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व घडले. या सर्वांची आमदार व मंत्रिपदाची कारकीर्द प्रभावी ठरली. शहर विकासात या सर्वांचा मोठा वाटा आहे.

Web Title: A crowd of aspirants from corporators for MLAs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.