ंसवलतीच्या कोळशातून कोट्यवधींचा फटका
By Admin | Updated: October 9, 2015 03:11 IST2015-10-09T03:11:20+5:302015-10-09T03:11:20+5:30
सवलतीच्या दरात कोळसा घेऊन वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) ला चुना लावल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

ंसवलतीच्या कोळशातून कोट्यवधींचा फटका
सीबीआयचे अनेक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे
नागपूर : सवलतीच्या दरात कोळसा घेऊन वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) ला चुना लावल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सीबीआय आणि वेकोलिच्या दक्षता पथकाकडून छापा मारून संबंधित कंपन्यांची बुधवारी तपासणी केली आहे.
शासकीय धोरणानुसार औद्योगिक कंपन्यांना सवलतीच्या (सबसिडी) दरात कोळसा पुरवठा केला जातो. अनेक दिवसांपासून काही कंपन्या बंद पडल्या आहे. तरीसुद्धा या कंपन्यांना वेकोलिकडून सवलतीच्या दरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कोळसा पुरविला जातो. या कंपन्या हा कोळसा दामदुप्पट दराने खुल्या बाजारात विकतात. यातून वेकोलिला कोट्यवधींचा फटका बसतो.
अनेक दिवसांपासून या गैरप्रकाराची तक्रार सीबीआय आणि वेकोलिला मिळाली होती. प्राथमिक चौकशीत सॅफरॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (मानेगाव, सावनेर) चिंतेश्वर स्टील इंडस्ट्रीज प्रा. लि. उनगाव (कामठी) आणि एस. एन. मालू स्टील प्रा. लि. सेलू, भंडारा रोड, तसेच कळमन्यातील श्रीराम स्टील कंपनीसह सुमारे एक डझन औद्योगिक कंपन्यांच्या शाखा या गोरखधंद्यात गुंतल्याची माहिती पुढे आली आहे. त्याांन १५०० रुपये प्रति टन भावाने सुमारे २० हजार टन कोळसा सवलतीच्या दरात उपलब्ध झाला आहे. त्याची या कंपन्यांनी खुल्या बाजारात विक्री केल्याची माहिती आहे.
सीबीआय आणि वेकोलिच्या दक्षता पथकाने संबंधित कंपन्यांकडे बुधवारी एकाचवेळी संयुक्त आकस्मिक छापे घातले. चौकशीनंतर संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आले. सीबीआयने संबंधित कंपन्यांच्या संचालकांना चौकशीसाठी गुरुवारी कार्यालयात बोलवून घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरच्या सुमारे २०० औद्योगिक कंपन्याच्या शाखांना सवलतीच्या दरात कोळसा पुरवठा केला जातो. त्यातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. (प्रतिनिधी)