वादळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:05+5:302021-04-11T04:08:05+5:30

नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळी अखेर वादळ धडकले. शहरात फारसे नुकसान झाले नसले तरी ग्रामीण ...

Crops damaged by torrential rains | वादळी पावसाने पिकांचे नुकसान

वादळी पावसाने पिकांचे नुकसान

नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळी अखेर वादळ धडकले. शहरात फारसे नुकसान झाले नसले तरी ग्रामीण भागात मात्र मेघगर्जनेसह वादळी पाऊसही झाला. यामुळे फळझाडांचे आणि शेतीचे नुकसान झाले. विशेषत: सावनेर, पारशिवणी, रामटेक, खात या परिसराला अधिक फटका बसला. संत्रा, माेसंबी व आंब्याचे तसेच भाजीपाल्याच्या विविध पिकांसह काही प्रमाणात गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. काही गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला हाेता. विजांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.

नागपूर शहरात आलेल्या वादळाने फारसे नुकसान झाले नाही. मात्र, सोसाट्याचा वारा असल्याने व विजा कडाडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बदललेल्या वातावरणामुळे तापमान खालावले होते. दिवसभरात ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसभर चांगले ऊन पडले असले तरी सायंकाळनंतर वातावरणाचा रंग बदलला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळासह पावसानेही धडक दिली. रामटेक शहरासह तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसायला सुरुवात झाली. वादळामुळे शहरात एक तास तर ग्रामीण भागात दीड ते दाेन तास वीज पुरवठा खंडित झाला हाेता. पाऊस सुरू हाेताच शहरातील गुजरी बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची व विक्रेत्यांची तारांबळ उडाली हाेती. पावसाचा जाेर तासभर कायम हाेता.

या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यात संत्रा, मोसंबी व भाजीपाल्यासह गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. तालुक्यातील बडेगाव परिसरात साेसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यामुळे त्यांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली हाेती. रात्री ८.३० वाजेपर्यंत ढगाळ वातावरण असले तरी या भागात पावसाच्या सरी बरसल्या नाहीत. मात्र, जाेरदार पाऊस काेसळण्याची शक्यता बळावली हाेती.

दरम्यान, कळमेश्वर शहर व तालुक्यातील काही भागात सायंकाळी ६ वाजेपासून वादळाला तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. या पावसामुळे तालुक्यात पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. पारशिवनी शहरासह परिसरातील काही गावांमध्ये वादळासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. माैदा तालुक्यातील खात परिसरात वादळी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने आंब्याचे माेठे नुकसान झाले. हिंगणा शहर व परिसरात साेसाट्याचा वारा वाहत हाेता. मात्र, पावसाच्या सरी बरसल्या नाहीत.

Web Title: Crops damaged by torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.