‘स्वाईन फ्लू’ बैठकीपुरतेच गंभीर
By Admin | Updated: February 10, 2015 00:53 IST2015-02-10T00:53:30+5:302015-02-10T00:53:30+5:30
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही.

‘स्वाईन फ्लू’ बैठकीपुरतेच गंभीर
दोन मृत संशयितांचे नमुने तपासलेच नाही
नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही. विशेष म्हणजे, मेयोच्या प्रयोगशाळेत दिवसभरात फक्त १३ नमुनेच तपासले जातात. सोमवारी मेडिकलकडून १८ नमुने पाठविण्यात आले होते, यातील फक्त सात नमुने तपासण्यात आले. यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याच्या तुलनेत उपराजधानीत स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असताना, प्रशासन मात्र बैठकीपुरतेच गंभीर असल्याचे या वास्तवातून समोर आले आहे.
मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात रविवारी रात्री ९ वाजता बेसा येथील एका ३५ वर्षीय रुग्णाचा तर याच रात्री १.३० वाजता छिंदवाडा येथील ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. रविवारी मेयोची प्रयोगशाळा बंद राहत असल्याने सोमवारी या दोन मृतांसह १८ संशयित रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले. परंतु यातील फक्त सातच नमुने तपासण्यात आले. परिणामी संशयित रुग्णांवरील उपचाराची दिशा ठरविण्यास डॉक्टर अडचणीत आले आहेत तर मृताचे नातेवाईक दहशतीच्या वातावरणात आहेत.
दोन मुलांना स्वाईन फ्लू
उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच पाच वर्षांखालील दोन मुलांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये स्वाईन फ्लू दिसून येणे हे आजारात वाढ होण्याचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा यांच्यासह ६३ व २४ वर्षांची महिला तर ५० व ४४ वर्षांचे पुरुष आहेत. सध्या मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)
ंहायकोर्टात अर्ज
स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे व्यावसायिक अनिल आग्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. आग्रे यांची डेंग्यू आजारासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज करून याचिकेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अर्जात महानगरपालिका, मेडिकल व मेयो रुग्णालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु प्रशासन वेगवान पावले उचलत नसल्यामुळे स्वाईन फ्लूने अनेकांचे बळी घेतले, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. ताज्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात स्वाईन फ्लूने २२ रुग्णांचे बळी घेतले आहेत.
वैज्ञानिक विश्लेषणाची गरज
मेडिकलमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २८ महिला आहेत तर १२ पुरुष आहेत. तज्ज्ञांच्या मते महिलामंध्ये स्वाईन फ्लू वाढण्याला घेऊन वैज्ञानिक विश्लेषण होण्याची गरज आहे. सोबतच मृतांमध्ये ३० वर्षांखालील चार रुग्णांचा, ३० ते ४० वर्षांतील चार रुग्णांचा तर ५० ते ६० वर्षांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असतानाही सर्वात जास्त याच वयाच्या आतील रुग्णांचा मृत्यू झाल्याने याविषयीही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.