घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:32 IST2017-10-09T01:32:05+5:302017-10-09T01:32:20+5:30

देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे,

 Critical questions before solid waste management | घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

ठळक मुद्देतेज पी.सिंह : ‘नीरी’त ‘ईटीबीडब्ल्यूसी’वर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे, असे मत ‘एम्स’चे प्रा.तेज पी.सिंह यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर’चा अमृत महोत्सव व ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून ‘बीआरएसआय’च्या (द बायोटेक रिसर्च सोयायटी आॅफ इंडिया) सहकार्याने ‘ईटीबीडब्ल्यूसी’ (इमर्जिन्ग ट्रेन्ड्स इन बायोटेक्नॉलॉजी फॉर वेस्ट कन्व्हर्जन) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते रविवारी बोलत होते.
८ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्घाटन ‘नीरी’च्या सभागृहात झाले. यावेळी मोहाली येथील ‘सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग’चे वैज्ञानिक प्रा.अशोक पांडे, ब्लैस पास्कल विद्यापीठाच्या रसायन आणि जीवरसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. क्लॉड गिल्स डुसॅप, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनावर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. जीवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक कल्याणाची बरीच मोठी क्षमता आहे. मात्र या क्षेत्रात भारत अद्यापही मागेच आहे. ‘डाटाबेस’ विकसित करण्यात देशाने फारसे योगदान दिलेले नाही, याकडे प्रा.सिंह यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘स्ट्रक्चरल बेसिस आॅफ अ‍ॅन्टिबॅक्टेरियल अ‍ॅक्शन आॅफ इन्नेट इम्यून प्रोटिन्स अ‍ॅन्ड देअर अप्लिकेशन्स अ‍ॅज प्रोटीन अ‍ॅन्टीबायोटिक’ या विषयावर बीजभाषण केले. ‘बीआरआयएस’कडून समाजहितासंदर्भात संशोधन करण्यावर भर देण्यात येईल व एकत्रित प्रयत्नांतून नक्कीच सकारात्मक परिणाम समोर येतील, असा विश्वास प्रा.पांडे यांनी व्यक्त केला. डॉ.राकेश कुमार यांनी ‘नीरी’ने पर्यावरणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानांची माहिती दिली. कचºयाचे ऊर्जा किंवा इतर स्वरूपात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे देशात रोजगाराच्यादेखील संधी वाढतील, असे प्रतिपादन डॉ.कुमार यांनी केले.
प्रा.क्लॉड गिल्स डुसॅप यांच्या हस्ते ‘बीआरएसआय’ची वार्षिक पुस्तिका व परिषदेच्या ‘ई-प्रोसिडिंग्ज’चे विमोचन करण्यात आले. ‘बीआरएसआय’ पुरस्कारांचेदेखील यावेळी वितरण करण्यात आले. डॉ. सुनील कुमार यांनी परिषदेबाबत माहिती दिली. परिषदेदरम्यान तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कचरा पुनर्प्रक्रियेतील जागतिक विकास, कचºयापासून जैवइंधन व जैविक उत्पादने, नॅनोटेक्नोलॉजीचा उपयोग इत्यादी मुद्यांवर देशविदेशातील वैज्ञानिक, अभियंते व तज्ज्ञ भाष्य करणार आहेत.

Web Title:  Critical questions before solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.