विदर्भातील जंगल पर्यटनाची क्रेझ वाढली
By Admin | Updated: August 29, 2016 02:44 IST2016-08-29T02:44:08+5:302016-08-29T02:44:08+5:30
मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये विदर्भातील जंगल पर्यटनाची प्रचंड क्रेझ वाढली आहे. यामुळेच गत पाच वर्षांत जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

विदर्भातील जंगल पर्यटनाची क्रेझ वाढली
जंगल सफारी : वर्षभरात १ लाख १३ हजार पर्यटक
नागपूर : मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये विदर्भातील जंगल पर्यटनाची प्रचंड क्रेझ वाढली आहे. यामुळेच गत पाच वर्षांत जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
वन विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार मागील २०१३-१४ या वर्षांत विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, टीपेश्वर अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व मानसिंगदेव अभयारण्यात ७४ हजार ५११ पर्यटकांनी जंगल सफारी केली. तसेच २०१४-१५ मध्ये ही संख्या ७३ हजार ६६७ होती तर २०१५-१६ मध्ये यात अचानक प्रचंड वाढ होऊन ती संख्या १ लाख १३ हजार ९३२ वर पोहोचल्याचे दिसून येत आहे. शिवाय यातून पेंच व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशनला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. जाणकारांच्या मते, मागील काही वर्षांत सामान्य नागरिकांमध्ये जंगल आणि वन्यप्राण्यांविषयी आकर्षण वाढले आहे. त्याचा फायदा विदर्भातील जंगल पर्यटनाला होत आहे. विदर्भातील जंगल पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटक येऊलागले आहे. मात्र त्याचवेळी वन विभाग या पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. आजही पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव आणि उमरेड-कऱ्हांडला येथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो.
उमरेड-कऱ्हांडला आणि मानसिंगदेव अभयारण्यात अजूनपर्यंत साधी निवासाची सुद्धा व्यवस्था नाही. एकिकडे वन विभागाला या जंगल पर्यटनातून कोट्यवधीचा महसूल मिळत असताना सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशाने मात्र पर्यटकांच्या आवडी-निवडी व गरजा लक्षात घेऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामुळे विदर्भातील पर्यटक मध्य प्रदेशाकडे वळत आहेत. या पर्यटकांना विदर्भात थांबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. परंतु वन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यात कमी पडत आहे. (प्रतिनिधी)
‘एमटीडीसी’ ठरले पांढरा हत्ती
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) नागपुरातील विभागीय कार्यालयाने विदर्भातील आपले सर्व रिसोर्ट आणि हॉटेल्स भाडेपट्टीवर खासगी ठेकेदारांच्या हाती दिले आहेत. शिवाय स्वत: केवळ ‘रिसेप्शनिस्ट’ ची भूमिका पार पाडत आहे. वास्तविक या कार्यालयाकडून विदर्भातील पर्यटन विकासासंबंधी अनेक अपेक्षा आहेत. मात्र मागील काही वर्षांत हा विभाग केवळ पांढरा हत्ती बनला आहे. या विभागाकडून विदर्भातील पर्यटन विकासासाठी कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाही. यामुळे नागपुरातील एमटीडीसीच्या विभागीय कार्यालयाला नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, येथील काही अधिकाऱ्यांनी या कार्यालयाला स्वत:ची मक्तेदारी समजली आहे. अशाच काही घटनांमुळे मागील तीन वर्षांपूर्वी हा विभाग बदनाम झाला होता. या विभागातील एका अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केले होते. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुद्धा करण्यात आली होती.