९० हजार मासेमारांवर रोजगाराचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:26 IST2021-05-13T00:23:40+5:302021-05-13T00:26:38+5:30
fishermen employment crisis गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही काेराेना महामारीच्या संकटाने सर्वांना बेजार केले आहे. मासेमारांचीही हीच अवस्था आहे. काेराेना संकटांतर्गत लागलेल्या टाळेबंदीमुळे मासेमारी आणि व्यवसायावरही परिणाम झाला असून विदर्भातील ९० हजाराच्यावर मासेमारांवर राेजगाराचे संकट निर्माण झाले आहे.

९० हजार मासेमारांवर रोजगाराचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही काेराेना महामारीच्या संकटाने सर्वांना बेजार केले आहे. मासेमारांचीही हीच अवस्था आहे. काेराेना संकटांतर्गत लागलेल्या टाळेबंदीमुळे मासेमारी आणि व्यवसायावरही परिणाम झाला असून विदर्भातील ९० हजाराच्यावर मासेमारांवर राेजगाराचे संकट निर्माण झाले आहे.
मत्स्यपालक आणि शासनाच्या समितीवरील सदस्य प्रभाकर मांढरे यांनी सांगितले, विविध संस्थांच्या माध्यमातून विदर्भात नाेंदणीकृत मत्स्य व्यवसायिकांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. लहानमाेठे तलाव व जलाशयाच्या गाेड्या पाण्यात मासेमारी करणारे तसेच किरकाेळ व थाेक विक्रेत्यांचा यात समावेश आहे. काेराेनाच्या प्रकाेपावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही टाळेबंदी लागू केली. नियमांचे पालन व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने बाजारही बंद केले आहेत. त्यामुळे मासेविक्री नगण्य झाली आहे. मार्च, एप्रिल व मे हा मासेमारीचा हंगाम असताे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीही हा हंगाम वाया गेला, असेच म्हणावे लागेल. मासेमारी व विक्रीवर परिणाम झाल्याने तलाव/जलाशय ठेकेदार, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, मत्स्य कास्तकार, खाजगी कंत्राटदार यांचे उत्पन्नही घटले आहे. अशा परिस्थितीत तलाव व जलाशयांवरील कंत्राट नुतनीकरणाची रक्कम भरणे मत्स्य व्यावसायिकांसाठी अडचणीचे झाले आहे.
गेल्या वर्षी अशाच परिस्थितीमुळे राज्य शासनाने ठेका नुतनीकरणाची रक्कम जमा करण्यास डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. यावर्षीही तशीच परिस्थिती असल्याने सरकारने ठेका रक्कम जमा करण्यास पुन्हा डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी संस्थेच्यावतीने प्रभाकर मांढरे यांनी केली आहे.
३० हजाराच्यावर तलावांवर मासेमारी
महाराष्ट्रात ४ लाख ८० हजार हेक्टर वाॅटरशेड मासेमारीलायक आहे. त्यातील १ लाख ८० हजाराच्या जवळपास विदर्भात आहेत. विदर्भातील जवळपास ३० हजाराच्यावर तलावांवर मासेमारी हाेते. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली या जिल्ह्यातच २० हजार तलावांची संख्या आहे. शिवाय धरणावरील जलाशय व नदीपात्रातही मासेमारी केली जाते. बाजार बंद असल्याने मासे विक्री बंद आहे व विक्री बंद असल्याने मासेमारी थांबली आहे. त्यामुळे लहान मासेमारांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी मदत देण्याची मागणी मांढरे यांनी केली आहे.