नागपूरच्या इतवारीत चाकू घेऊन गुन्हेगारांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:43 IST2018-12-13T23:42:08+5:302018-12-13T23:43:41+5:30
इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

नागपूरच्या इतवारीत चाकू घेऊन गुन्हेगारांची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
नेहरू पुतळ्याजवळ आमेसर ट्रेडर्स आहे. तिथे विजय डहाके काम करतो. गुरुवारी रात्री विजयचा भाऊ त्याला भेटायला आला. तो दुकानासमोर उभा होता. तेव्हा त्याच्याजवळ उभा असलेल्या एका गुन्हेगाराने त्याला थापड मारली. विनाकारण थापड मारल्याने विजयने कारण विचारले. तेव्हा थापड मारणारा गुन्हेगार अधिक रागात आला. तो विजयला शिवीगाळ करू लागला. विजयला काही समजण्याअगोदरच दोन युवक आले. त्यांनी चाकू घेऊन विजयवर हल्ला केला. विजय जीव वाचवून पळू लागला. ते पाहून थापड मारणारा व त्याचे दोन साथीदार चाकू दाखवून लोकांना धमकावू लागले. अतिशय वर्दळीचा भाग असल्याने लोकांचीही गर्दी झाली. लोक आरोपीला पकडण्यासाठी धावले. त्यांनी नवाब शाह नावाच्या आरोपीला पकडले. त्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका तरुणाने हिंमत दाखवून त्याला पकडले. त्याचे इतर साथीदार पळाले. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्येही रोष पसरला आहे.
घटनेची माहिती होताच लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नवाबला ताब्यात घेतले. तो आझमशहा चौकात राहतो. नेहरू पुतळा परिसर हा व्यापारी परिसर आहे. रात्रीच्या वेळी येथे गुन्हेगार भटकत असतात. व्यापाऱ्यांवर ते नजर ठेवून असतात. व्यापारीही आपल्या जीवाच्या भीतीने तक्रार करीत नाही.