पोलिसांना डिवचणारे गुन्हेगारांचे होर्डिंग
By Admin | Updated: August 3, 2015 02:59 IST2015-08-03T02:59:03+5:302015-08-03T02:59:03+5:30
पोलिसांवर विश्वास ठेवण्याऐवजी गुन्हेगार आपली खुन्नस स्वत: काढू लागले आहेत.

पोलिसांना डिवचणारे गुन्हेगारांचे होर्डिंग
ब्रँडिंग करताहेत ‘भाई’ : २५ दिवसानंतर आरोपी मोकाट
जगदीश जोशी नागपूर
पोलिसांवर विश्वास ठेवण्याऐवजी गुन्हेगार आपली खुन्नस स्वत: काढू लागले आहेत. २५ दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारात जखमी झालेला गुन्हेगार इफेखार ऊर्फ भतीजाचे मोमिनपुरा येथे लागलेले होर्डिंग याची साक्ष देत आहेत. ९ जुलै रोजी मोमिनपुरा येथील बकरा मंडीजवळ इफ्तेखारवर गोळीबार करण्यात आला. यात एक गोळी इफ्तेखारच्या डोक्याच्या डाव्या बाजूला तर दुसरी गोळी गालाच्या उजव्या बाजूला लागली. वेळेवर उपचार मिळाल्याने त्याला वाचवण्यात आले. त्याच्या विरुद्ध खून, मारहाण, दंगा आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहे. मोमिनपुऱ्यात त्याचा चांगलाच दबदबा आहे. त्याने वादातीत जमीन खरेदी-विक्रीतून खूप संपत्ती जमविली आहे. त्यामुळे त्याच्या शत्रूंची संख्याही खूप आहे.
गोळीबाराची ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यावरून ती अतिशय सुनियोजित पद्धतीने अमलात आणण्यात आल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा हल्लेखोर दिसून येतात. पोलिसांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांशी विचारपूस केली परंतु अजूनपर्यंत हल्लेखोरांचा कुठलाही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सूत्रांनुसार या हल्ल्यासंदर्भात इफ्तेखारच्या काही प्रतिस्पर्ध्यांवर संशय आहे. लोकमतने त्याचा खुलासाही केला होता. यानंतर पोलिसांनी इफ्तेखारला विश्वासात घेऊन विचारपूस सुद्धा केली होती. परंतु त्याने पोलिसांना काहीच सांगितले नाही. यानंतर मोमिनपुरा चौकासह अनेक ठिकाणी इफ्तेखारचे अभिनंदन करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले. या होर्डिंग्जवर इफ्तेखारचे अभिनदन करीत असतानाच हल्लेखोर आपल्या उद्देशात अपयशी ठरल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोेलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांना डिवचणारे होर्डिंग्ज शहरात पहिल्यांदाच लागल्याचे दिसून येत आहेत.
झोन तीन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे हद्दीतील परिसर तर गुन्हेगारांनी लावलेल्या अवैध होर्डिंग्जने भर पडली आहेत. काही गुन्हेगारांनी तर त्या भागातही होर्डिंग लावले आहेत जिथे ते खंडणी वसुली आणि इतर अवैध व्यवसाय करतात. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचा परिसर मादक पदार्थ, जुगार आणि मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या ‘अंडे’ च्या होर्डिंगने भरला आहे. हा गुन्हेगार पोलिसांसाठी सोन्याचे अड्डे देणारी कोंबडी आहे.
त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा केली जात नाही. ‘अंडा’चा या परिसरात इतका दबदबा आहे की, त्याने पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर होर्डिंग लावून आपली ताकद दाखवून दिली आहे.
अनेक ठिकाणी पोलीस गुन्हेगारांसमोर कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सोनेगाव येथील जमीन वादाचे प्रकरण याचा उत्तम पुरावा आहे. या प्रकरणाला सोनेगाव पोलिसांनी गंभीरतेने घेतलेच नाही. घटनेच्या दिवशी आठ तासानंतर पोलिसांना जाग आली. वरिष्ठांनी फटकारल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. या प्रकरणामुळे सोनेगावच्या ठाणेदाराची बदली सुद्धा करण्यात आली.
जेल ब्रेक प्रकरणातील चार आरोपी सापडल्याने गुन्हे शाखा स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. यशोधरानगरात बसल्याबसल्या पोलिसांनी कट्टे व काडतूस सापडल्याने तर ‘गिनीज बुक’ मध्ये नाव नोंदविल्यासारखे त्यांना वाटत आहे. या अतिउत्साहामुळे त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांवच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट खोटी असल्याचेच वाटत आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर नोंदविण्यात आलेल्या खंडणी वसुलीचे प्रकरण सुद्धा खोटे होते का? ज्याला आरोपी बनविण्यात आले होते त्याच्याच हॉटेलमध्ये बसून फुकटची दारू आणि जेवणाचा आनंद घेण्याची गोष्टही खोटी होती का? गुन्हेगारी विश्वाशी संबंधित लोकांना खरा प्रकार माहीत आहे, त्यामुळेच गुन्हे शाखेला माहिती पोहोचवण्यास कुणीही आता पुढे येत नाही.
रेकॉर्डिंगचीही चर्चा
गुन्हे शाखेतील एका शिपायाचे कट्टे व काडतूस प्रकरणात रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये तो शिपायी एका व्यक्तीकडून वसुलीसाठी निर्दोष तरुणाला फसवल्याची चर्चा करीत आहे. या शिपायाच्या सीडीआरची चौकशी केल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.
‘पोलीस मित्र’ ओळखपत्रे
पोलीस मित्रांसाठी तयार करण्यात आलेली ओळखपत्रे घेऊन अनेक संदिग्ध मंडळी शहरात फिरत आहेत. या कार्डच्या माध्यमातून ते अवैध धंदे सुद्धा चालवित आहेत. एका ठाणेदार कुठलीही चौकशी न करता पोलीस मित्राचे ओळखपत्र प्रसादासारखे वाटत आहे. एका वाचकाने अशाच पद्धतीने एक ‘आयकार्ड’ लोकमतला पाठविले आहे.