लोकमत न्यूज नेटवर्ककुही : नागपूर शहरातील 'प्रॉपर्टी डीलर'ची कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरगाव परिसरात हत्या करण्यात आल्याचे रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आढळून आल्या आहेत, त्यांची हत्या कुणी व कशासाठी हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
देवराव श्यामराव घरजाळे (५६, रा. प्लॉट क्रमांक-०६, शिवांगीनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर), असे मृताचे नाव आहे. ते रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरी हजर होते. त्याचवेळी त्यांना त्याचे मावसभाऊ चिराग काकडे यांचा फोन आला. त्यानंतर त्यांचे मामा नारायण भेंडे (रा. कुसुंबी) यांचे निधन झाले असून, आपण अंत्यसंस्कारासाठी कुसुंबी येथे जात असल्याचे सांगून ते (एमएच ४९ डब्ल्यू ४८८९) क्रमांकाच्या मोटारसायकलने कुसुंबी येथे जाण्यासाठी एकटेच घराबाहेर पडले. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास ते उमरगाव-पांढरकवडा मार्गावर मृतावस्थेत पडून असल्याची माहिती चुलत आत्तेबहीण निशा बाळू भोयर (रा. पिपळा, नागपूर) हिने फोनवर दिली, अशी माहिती त्यांचा मुलगा मंथन घरजाळे (२१) याने दिली.
माहिती मिळताच मंथन, त्याची थोरली बहीण पूजा (२६) व मित्र रोहित दूधराम सोनवने (२२, रा. शिवांगीनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) या तिघांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यांची हत्या कुणी व कशासाठी केली, हे अद्याप माहीत झाले नाही. याप्रकरणी कुही पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतल राणे व उपनिरीक्षक रमेश ताजने संयुक्तरीत्या करीत आहेत.
गळा अर्धवट चिरलेला
उमरगाव-पांढरकवडा मार्गावरील वळणावर असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह पडून होता. जवळच त्यांची (एमएच ४९ डब्ल्यू ४८८९) क्रमांकाची मोटारसायकल सुस्थितीत उभी होती. त्यांच्या गळा अर्धवट चिरलेला होता तर चेहरा व उजवा डोळा, डोक्यावर उजव्या बाजूला व मागे, उजवा कान, दोन्ही खांदे, छातीच्या दोन्ही बाजूला, पोट, पाठ व करंगळीवर शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.
खासगी पतसंस्थेत व्यवस्थापकपदी नोकरी
देवराव घरजाळे नागपूर शहरात पार्टनरशिपमध्ये प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करायचे. ते नागपुरातील पिपळा येथील न्यू नागपूर महिला ग्रामीण विकास सहकारी पतसंस्था मर्यादित या खासगी पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करायचे. नरेंद्र नत्थूजी पेरकर, सुनील मारोतराव काळकर, भोला प्रभूजी दुधाने, मोरेश्वर देवराव कडू हे त्यांचे प्रमुख व्यवसाय पार्टनर होय, अशी माहिती मंथन घरजाळे याने दिली.