फेसबुकवर मुस्लीम धर्माचा अवमान - चार आरोपींविरुद्ध नोंदविला गुन्हा
By Admin | Updated: July 1, 2014 00:56 IST2014-07-01T00:56:16+5:302014-07-01T00:56:16+5:30
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे अपलोड करून मुस्लीम धर्माचा अनादर करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) व २९५(अ) आणि माहिती तंत्रज्ञान

फेसबुकवर मुस्लीम धर्माचा अवमान - चार आरोपींविरुद्ध नोंदविला गुन्हा
नागपूर : फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे अपलोड करून मुस्लीम धर्माचा अनादर करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) व २९५(अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(अ) व ६७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. संजय शर्मा, हनी उपाध्याय, चंदन कुमार व प्रवीण सिंग अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींचे फेसबुक अकाऊंटही बंद करण्यात आले आहे.
यशोधरानगर येथील फहीम शमीम खान, वर्धमाननगर येथील मुफ्ती मुजतबा शरीफ खान, योगेंद्रनगर येथील मौलाना मोहम्मद फैझ अहमद व महाल येथील मौलाना मोहम्मद अतिकर रहमान सिद्दीकी यांनी यासंदर्भात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. १० एप्रिल रोजी मुंबई येथील शाहीद समीर यांनी फेसबुकवर काही चांगली धार्मिक छायाचित्रे टाकली होती. त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. परंतु दोन दिवसांनी आरोपी संजय शर्मा, हनी उपाध्याय, चंदन कुमार व प्रवीण सिंग यांनी छायाचित्रांबाबत अवमानजनक प्रतिक्रिया नोंदविणे सुरू केले. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात १६ एप्रिल रोजी यशोधरानगर पोलिसांकडे लिखित तक्रार दिली. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती त्यांनी केली होती. दरम्यान, यशोधरानगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)