लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : काटोल-वरुड सिमेंट रस्त्यावर बायपासपासून भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकून अपघात होतात. लोकमतने याकडे लक्ष वेधल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केवळ नावापुरती डागडुजी केली. काही दिवसांतच ती उखडली आणि भेगा आणखी रुंद झाल्या. जुन्या भेगांबरोबरच नव्या भेगा तयार होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काटोल बायपासपासून पारडसिंगा मार्गावरील ढिवरवाडी येथील लेआउटसमोर रस्त्याच्या मध्यभागी पाय अडकावा इतकी मोठी भेग पडली आहे. या भेगेमध्ये दुचाकीचे चाक अडकून मागील आठवड्यात दोन दुचाकीस्वार उलटल्याच्या घटना घडल्या. काटोलमधील सुभाष पोटोडे हे काटोलकडे येत असताना त्यांच्या दुचाकीचे चाक याच भेगेत अडकल्याने वाहन हवेत उडाले. सुदैवाने समोरून किंवा मागून वाहन नसल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, डोक्याला मार लागून जखमी झाले. नागरिकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यांचा मुलगा गिरीश पोटोडे घटनास्थळी पोहोचला असता, सिमेंट रस्त्याच्या दोन स्लॅबमध्ये मोठी भेग असल्याचे दिसले.
ढिवरवाडीपासून काटोलपर्यंत या सिमेंट रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. स्थानिकांच्या या मार्गावर काहीजण पडले. विशेष म्हणजे हा भाग वाहतुकीचा अत्यंत वर्दळीचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०१९ मध्ये तयार केला होता. सिमेंटचा रस्ता २० ते २५ वर्षे टिकतो, अशी स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, सहा-सात वर्षातच या रस्त्याची पोलखोल झाली. निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि कर्मचारी या भेगांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करताहेत. आता या रस्त्यावर फक्त पॅचवर्क न करता संपूर्ण खराब झालेले सिमेंट स्लॅब काढून नव्याने मजबूत रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे.
जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. यासाठी जनहित याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही तयारी स्थानिकांनी दर्शविली आहे.
Web Summary : Cracks on the Katol-Warud cement road are causing accidents as motorcycle wheels get stuck. Patchwork repairs by the National Highway Authority have failed, widening the cracks. Locals demand complete reconstruction instead of superficial fixes, threatening legal action if neglect continues.
Web Summary : काटोल-वरूड सीमेंट सड़क पर दरारों के कारण दुर्घटनाएँ हो रही हैं, क्योंकि मोटरसाइकिल के पहिये फंस जाते हैं। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा किया गया पैचवर्क विफल रहा है, जिससे दरारें चौड़ी हो गई हैं। स्थानीय लोग सतही सुधारों के बजाय पूर्ण पुनर्निर्माण की मांग करते हैं और लापरवाही जारी रहने पर कानूनी कार्रवाई की धमकी देते हैं।