कोविड परवानगी मागणाऱ्या रुग्णालयांना हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:36+5:302021-04-16T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मागणाऱ्या सर्व रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी प्रदान करावी, असे ...

कोविड परवानगी मागणाऱ्या रुग्णालयांना हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मागणाऱ्या सर्व रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी प्रदान करावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले. या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यास व बेडची संख्या वाढविण्याच्या अटीसह उपचारास परवानगी देण्यात येईल.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशुंडी, डॉ. राजन बारोकर, डॉ. राजेश गोसावी व डॉ. निर्मल जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत रेमडेसिविरच्या अति वापरावर चिंताही व्यक्त करण्यात आली. यापूर्वी कोरोनाची आढावा बैठक पार पडली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सहभागी झाले होते.
पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी यालाच प्रशासनाचे सध्या सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा व मनपा प्रशासन संक्रमितांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. भोपाळ, भिलाई येथून ऑक्सिजन आणणे व एमआयडीसीमधील बंद पडलेला प्लांट पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. विभागीय आयुक्तांनी सांगितले की, सरकारी व खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. पक्वासा आयुर्वेदिक कॉलेज व ईएसआयसी रुग्णालयातही बेड वाढविण्यास सांगण्यात आले आहे. कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये २०० बेड व एम्समध्ये २०० बेडची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
बॉक्स
होम आयसोलेशन व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक लक्ष द्यावे
पालकमंत्री राऊत यांनी यंत्रणेवर अधिक दबाव असल्याची बाब मान्य करीत मनपाला होम आयसोलेशन व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक लक्ष देण्यास सांगितले. ते म्हणाले, होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण बाहेर फिरत आहेत. ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात. असे लोक समाजासाठी घातक ठरू शकतात.
बॉक्स
वर्धेत होऊ शकते रेमडेसिविरचे उत्पादन
यावेळी पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, वर्धा येथील एका कंपनीने रेमडिसिविरचे उत्पादन सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून या कंपनीला केंद्राकडून तातडीने मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
रेमडेसिविर रामबाण नाही
कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी बैठकीदरम्यान सांगितले की, रेमडेसिविर हे रामबाण नाही. टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भ्रुशुंडी यांनी सांगितले की, रेमडेसिविरचा वापर सावधगिरीने व्हायला हवा. रुग्ण उपचारादरम्यान केवळ रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचा आग्रह धरतात; परंतु हे अत्यंत चुकीचे असून सर्वांनाच याची आवश्यकता नाही. इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक व जनतेमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. यामुळे या एकाच इंजेक्शनचा आग्रह न धरता. कोविडच्या प्रोटोकाॅलनुसार औषधोपचाराला प्राधान्य देण्यात येत आहे.