चुलत भावासह दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: September 17, 2015 03:53 IST2015-09-17T03:53:58+5:302015-09-17T03:53:58+5:30
लकडगंज भागात श्रीरामवाडी नयापुरा येथे झालेल्या शुभम हारोडे याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ...

चुलत भावासह दोघांना जन्मठेप
नागपूर : लकडगंज भागात श्रीरामवाडी नयापुरा येथे झालेल्या शुभम हारोडे याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने आरोपी चुलत भावासह दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सागर विजय हारोडे (२३) रा. प्रेमनगर नारायणपेठ आणि आकाश भय्यालाल सूर्यवंशी (२२) रा. धम्मदीपनगर यशोधरानगर, अशी आरोपींची नावे आहेत. शुभम श्यामकुवर हारोडे (२०), असे मृताचे नाव होते. तो प्रेमनगर कुंभारपुरा येथील रहिवासी होता. खुनाची ही घटना १६ आॅक्टोबर २०१३ रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली होती.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, शुभम हा आरोपी सागर हारोडे याचा चुलत भाऊ होता. पिवळी नदी भागात या दोघांच्याही विटाच्या भट्ट्या होत्या.कारागिरांच्या पळवापळवीवरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. वैमनस्य निर्माण झाले होते. गणपती उत्सव मिरवणुकीत तर फटाके फोडण्यावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.
घटनेच्या दिवशी शुभम हा आपले दोन मित्र आकाश भुडे आणि सुमित ढेरेसोबत खर्रा घेण्यासाठी मोहल्ल्यातीलच नीलेश पान पॅलेस येथे गेला होता. त्याचवेळी हल्लेखोर पॅशन मोटरसायकलने आले होते. त्यापैकी दोघे विधिसंघर्षग्रस्त बालक होते.
या सर्व जणांनी चाकू, हातबुक्क्यांनी हल्ला करून शुभमला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले होते. त्याच्यावर १८ घाव होते.
जखमी शुभमला चारचाकी वाहनातून राधाकृष्ण इस्पितळाकडे रवाना करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लकडगंज ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय आकोत यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १६ साक्षीदार तपासण्यात आले.
सबळ साक्षीपुराव्यांच्या आधारावर ९ सप्टेंबर रोजीच न्यायालयाने दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर केले होते. बुधवारी न्यायालयात शिक्षेवर दीर्घकाळ सुनावणी होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, तीन हजार रुपये दंड, भादंविच्या ३२४ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे, प्रशांत भांडेकर, फिर्यादीच्या वतीने सरकारला साहाय्य म्हणून अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय तर आरोपींच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे आणि अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)