सेमिनरी हिल्समधील क्वॉर्टर्समध्ये दांपत्य आढळले मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय
By योगेश पांडे | Updated: June 19, 2024 23:24 IST2024-06-19T23:23:22+5:302024-06-19T23:24:16+5:30
घटनास्थळावर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकेल

सेमिनरी हिल्समधील क्वॉर्टर्समध्ये दांपत्य आढळले मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्र सरकारी क्वॉर्टर्समधील दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज लावण्यात येत असला तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
दीपक गजभिये (५६) व विद्या गजभिये (५३) अशी मृतक पती-पत्नीची नावे आहेत. दीपक एअरफोर्समध्ये ड प्रवर्गातील कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तर विद्या या गृहिणी होत्या. हे दांपत्य मुळचे कामठीतील बुद्धनगर, जयभीम चौक येथील निवासी होते. मात्र १६ वर्षांपासून ते कामानिमित्त नागपुरात राहत होते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. या घटनेच्या वेळी त्यांचे मुलगा व मुलगी कामठीला कामाने गेले होते. दुपारी ते परतल्यावर दरवाजा उघडला असता दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तर विद्या निपचित पडल्या होत्या. त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळावर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकेल असे गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांनी सांगितले. या घटनेमुळे गजभिये यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.