Country's rule at majority of society: Mohan Gopal's opinion | देशाची सत्ता बहुसंख्य समाजाकडे हवी : मोहन गोपाल यांचे मत

देशाची सत्ता बहुसंख्य समाजाकडे हवी : मोहन गोपाल यांचे मत

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले.
हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे अधिवेशन यशस्वी पार पडले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तेलंगणाचे शिक्षण व आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षस्थानी तर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, स्वागताध्यक्ष श्रीनिवास गौड,अखिल भारतीय मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरैया, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पिली सुभाषचंद्र बोस, तेलंगणाचे पशुधन विकासमंत्री तलासनी श्रीनिवास यादव, उत्पादन शुल्कमंत्री व्ही. श्रीनिवास गौड, महाराष्ट्राचे पशुधन विकासमंत्री महादेव जानकर, माजी खासदार नाना पटोले, माजी खासदार खुशाल बोपचे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
भारतात बहुसंख्य असलेल्या इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक शोषण होत आहे. त्यामुळे या समाजाचा अद्याप विकास झाला नाही. या समाजांनी संघटित होऊन वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची गरज आहे असे गोपाल यांनी पुढे बोलताना सांगितले.
जानकर म्हणाले, ओबीसी समाज ज्यांच्याकडे मदतीची आस लावून बसलेला आहे, त्यांची नियत चांगली नाही. ते या समाजाला काहीही देणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने स्वत:च राजकीय शक्ती निर्माण करणे काळाची गरज आहे. या समाजाने स्वत:चा पक्ष स्थापन केला पाहिजे.
ओबीसी महासंघ अराजकीय संघटना आहे. ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन समाजाच्या अधिकारासाठी लढा द्यावा. आज गुणवत्ता वाचविण्याच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचा विरोध केला जात आहे. ओबीसी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची जनगणना केली जात नाही असे जीवतोडे यांनी सांगितले. दरम्यान, अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

Web Title: Country's rule at majority of society: Mohan Gopal's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.