Corona Virus in Nagpur; देश निश्चित ‘कोरोना’वर मात करेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:24 IST2020-04-06T21:23:50+5:302020-04-06T21:24:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय जनता पक्षाची स्थापना ही सत्तापरिवर्तनासाठी नाही तर समाज व देशात सकारात्मक बदल घडविण्याच्या ...

Corona Virus in Nagpur; देश निश्चित ‘कोरोना’वर मात करेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाची स्थापना ही सत्तापरिवर्तनासाठी नाही तर समाज व देशात सकारात्मक बदल घडविण्याच्या संकल्पातून झाली आहे. सध्या संपूर्ण जग ‘कोरोना’चा सामना करत आहे. अशा स्थितीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गरिबांच्या मदतीसाठी उभे राहायला हवे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच देश निश्चितपणे ‘कोरोना’वर मात करेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भाजपच्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी सोमवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘कोरोना’मुळे गरिबांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार डोळ्यासमोर ठेवून कार्य करा व समाजातील गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी पक्षाची लोकसेवा, लोकशिक्षण व लोकसंघर्षाची त्रिसूत्री पाळावी आणि सेवेसाठी पूर्ण योगदान द्यावे. ‘कोरोना’ची गंभीरता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनीदेखील ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले पाहिजे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.
पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश ‘सुपर इकॉनॉमी’ बनेल
सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागातून भाजप घडला. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रगती व विकासाकडे देश अग्रेसर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश ‘सुपर इकॉनॉमी’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.