शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 02:33 IST2016-08-19T02:33:28+5:302016-08-19T02:33:28+5:30
आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे.

शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते
उमा भारती : ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत ‘रक्षाबंधन’ केले साजरे
नागपूर : आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वत:चे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. परंतु शत्रूचे प्राण घेऊनदेखील देशाचे रक्षण होऊ शकते, स्वातंत्र्य दिले तर आपले जवान कराची व लाहोरमध्येही तिरंगा फडकवू शकतात. परंतु त्यांचे हात बांधले गेले आहेत, असे मत केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. गुरुवारी ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जवानांना राख्या न बांधता त्यांना टिळा लावून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
भारतातील तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘आजादी के ७० साल-याद करो कुर्बानी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दोन स्थळांना भेट देणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उमा भारती नागपुरात आल्या होत्या. नेमके गुरुवारी रक्षाबंधन येत असल्याने उमा भारती ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पोहोचल्या. हिंगणा मार्गावरील ‘सीआरपीएफ’च्या ‘ग्रुप सेंटर’वर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दहशतवादाचे परिणाम आपल्या देशाने खूप भोगले आहेत. पंजाब तर दहशतवाद्यांचा अड्डा झाला होता. परंतु आता तेथे शांती आहे. याचे सर्व श्रेय सुरक्षायंत्रणांना जाते. आपल्या देशात अनेक अंतर्गत आव्हाने आहेत.
पोलीस, सैन्य, निमलष्करी दलाचे जवान अडचणींमध्ये काम करीत असतात. अनेकदा दुर्गम भागात खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. परंतु तरीदेखील जवान जोमाने देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. या जवानांच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. वेळ आली तर त्यांच्यासोबत सीमेवरदेखील जायला तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. यावेळी ‘सीआरपीएफ’चे महासंचालक सुनील सिंह यांनी जवानांना मार्गदर्शन केले. देशाची अखंडता कायम राखण्यासाठी ‘सीआरपीएफ’ कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
यावेळी ‘सीआरपीएफ’चे ‘डीआयजी’ ए.पी.सिंह, दिनेश उनीगल, संजीव चौधरी, संचालक मनोज ध्यानी, सीमा तोलिया प्रामुख्याने उपस्थित होते. एम.ए.खान यांनी संचालन केले तर ए.पी.सिंह यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)