देशाला योग्य वैद्यकीय सेवांची गरज
By Admin | Updated: August 11, 2014 00:55 IST2014-08-11T00:55:21+5:302014-08-11T00:55:21+5:30
वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. दरम्यानच्या काळात याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन समोर येत आहे. अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन

देशाला योग्य वैद्यकीय सेवांची गरज
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस : पदग्रहण सोहळा थाटात
नागपूर : वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. दरम्यानच्या काळात याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन समोर येत आहे. अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन होत आहे. यूकेमध्ये वैद्यकीय क्षेत्राचा जेवढा विकास झाला आहे, तेवढाच विकास आपल्या देशातही झाला आहे; असे असले तरी योग्य प्रकारच्या वैद्यकीय सेवांची गरज मोठ्या प्रमाणात आहे, असे विचार कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट (यूके) डॉ. संजीव पेटकर यांनी मांडले.
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेसचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सेंटर पॉर्इंट हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ‘यशदा’चे महासंचालक डॉ. संजय चहांदे व टीएमएमसी मुंबई, विभागाचे प्रमुख डॉ. कनक नागले उपस्थित होते. यावेळी अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस २०१४-१५च्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रसिद्ध एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सुनील आंबुलकर यांनी तर कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसीनचे तज्ज्ञ डॉ. हरीश वरभे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.
डॉ. वरभे म्हणाले, यावर्षी व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषत: आजार व संशोधनावर सामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येईल. ‘थायरॉईडचे वाढते आजार’, ‘लहान मुले आणि मोठ्यांमध्ये वाढती स्थुलता’, ‘ट्रान्सफ्युजन मेडिसीन’, ‘आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी’ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ‘आप की अदालत’ हा अनोखा कार्यक्रमही घेण्यात येईल. नवीन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देणे, हा मुख्य उद्देश राहणार आहे. यावेळी उपस्थितांनीही आपले विचार मांडले.
पदग्रहण सोहळ्यानंतर डॉ. आंबुलकर यानी ‘आंतरग्रंथीचे आजार व उपचार पद्धती’यावर प्रकाश टाकला. डॉ. पटेकर यांनी ‘कार्डियाक अॅब्लेशन अॅण्ड बीयॉण्ड’, डॉ. चहांदे यांनी ‘हेल्थ सेक्टर अॅट क्रॉस रोड’ तर डॉ. नागले यांनी ‘मायकॉर्डियल रिव्हॅस्क्युलरायझेशन-इव्होल्युशन टू रिव्होल्युशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. राजीव मोहता व डॉ. प्राची महाजन यांनी केले. (प्रतिनिधी)