मतमोजणीचे ’काऊंटडाऊन’ यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: May 11, 2014 01:33 IST2014-05-11T01:33:01+5:302014-05-11T01:33:01+5:30
पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानस्थळी ‘डाटा एन्ट्री’चे काम अचूक व्हावे,

मतमोजणीचे ’काऊंटडाऊन’ यंत्रणा सज्ज
‘डाटा एन्ट्री’चा सराव
नागपूर : पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानस्थळी ‘डाटा एन्ट्री’चे काम अचूक व्हावे, यासाठी निवडणूक शाखेत सरावासाठी यंत्रणाही उभी करण्यात आली आहे. मतमोजणीशी संबंधित प्रत्येक आकडेवारी अचूक नोंदविल्या जावी, यावर आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतमोजणीस्थळी ‘डाटा एन्ट्री’ची व्यवस्था केली जाते. आकडेवारी अचूक आणि आयोगाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार नोंदविली जावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून या कामाचा सराव निवडणूक शाखेत सुरू आहे. १२ डाटा एन्ट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानस्थळी डाटा एन्ट्रीची जी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, त्याची रंगीत तालीम निवडणूक शाखेत सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विशेष सॉफ्टवेअर (इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) तयार करण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेली आकडेवारी अचूक आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी त्याची पडताळणीही केली जाणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी सरासरी १५०० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना येत्या १२ आणि १५ तारखेला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १६ मे रोजी सकाळी ८ वाजता कळमना मार्केट यार्डमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. नागपूर आणि रामटेकमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीची व्यवस्था आहे. प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. यंदा टपाल मतमोजणीसाठी आयोगाने विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अधिकार्यांना त्यांचे भ्रमणध्वनी सोबत ठेवता येणार आहेत. (प्रतिनिधी) .