Councilors briefly rescued from the dash of Apali bus | आपली बसच्या धडकेतून थोडक्यात बचावले नगरसेवक

आपली बसच्या धडकेतून थोडक्यात बचावले नगरसेवक

ठळक मुद्देचालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉ कॉलेज चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या आपली बसच्या धडकेतून एक कार थोडक्यात बचावली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कारमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक बसून होते. यातील एक नगरसेवक परिवहन समितीचे सदस्य आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर व परिवहन समितीचे सदस्य नितीन साठवणे कारने लॉ कॉलेजमार्गे सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयात येत होते. त्यांची कार लॉ कॉलेज चौकात आली असताना एमएच ३१ सीए ६०४५ क्रमांकाची आपली बस भरधाव वेगाने येथून जात होती. बस कारला धडक देणार तोच प्रसंगावधान ठेवून चालकाने कार दुसरीकडे वळविली. यामुळे कारमधील सर्वजण थोडक्यात बचावले.
त्यानंतर रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनी बस थांबविली. बस वेगाने चालवीत असल्याबाबत चालकाला जाब विचारला. परंतु चालकच मुजोरी करू लागला. आपली चुकी मानायला तयार नव्हता. याची सूचना परिवहन विभागाला दिली. पुणेकर व साठवणे महापालिकेत आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सभापती बंटी कुकडे यांना दिली.
कुकडे यांनी संबंधित चालक व वाहकावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.
पुणेकर व साठवणे यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला. कार चालकाच्या सतर्कतेमुळे वाचलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपली बस नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी चालविली जाते. चालक व वाहक मनमानी करीत असले तर त्यांना तत्काळ नोकरीवरून कमी केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. चालक व वाहकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. या प्रकरणातील दोषीवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.

Web Title: Councilors briefly rescued from the dash of Apali bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.